

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲसिडिटीचा (पित्त) त्रास झाला की तुम्ही तत्काळ गोळी घेवून यातून सुटका करण्याचा प्रयत्न करता. कारण हा त्रास असह्य करणार असतो. बदलते हवामान, ताण-तणाव, अपुरी झोप आणि पचनात झालेल्या बदलामुळे पित्ताचा त्रास होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहार, पुरेशी झोप आणि ताण-तणाव हे अपरिहार्य आहेत. ( Acidity Problem ) आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर पित्त विकारावर आहारातील बदलासंदर्भात काही टिप्स दिल्या आहेत. तुम्ही आपल्या आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश करुन पित्ताच्या विकारापासून सुटका करु शकता. जाणून घेवूया याविषयी…
धावपळीच्या जगण्यात आपले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. पाणी हे शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. तसेच शरीराचे तापमानही पाणी पिण्यावरच ठरते. लघवी ही रंगहीन होणे याचा अर्थ तुम्ही पुरेसे पाणी पित आहात. त्यामुळे दरररोज लघवी रंगहीन होईल एवढे पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे याेग्य प्रमाणात पाणी प्या.
प्रामुख्याने गोवा आणि कोकणातील कोकम फळ हे ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते. दुपारच्या जेवणाच्या काही तास आधी भजवलेल्या सब्जाच्या बिया एक ग्लास कोकम सरबतासोबत सेवन करावे. कोकम हे पित्तनाशक आहे. तुम्हाला जर ॲसिडीचा त्रास वारंवार हाेत असेल तर आहारात काेकमचा समावेश आवर्जून करा.
दुपारच्या जेवणात दही आणि भाताचा समावेश करण्याचा सल्ला दिवेकर देतात. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. दही आणि भातामुळे रक्तातील सारखेरची पातळी नियंत्रित राहते. पित्ताचा अधिक त्रास झाला तर हा एक उत्तम आहार ठरतो.
गुलकंदामध्ये विविध अँटिऑक्सिडंट असतात. दुधात मिसळून गुलकंद खाल्यास शांत झोप येण्यास मदत होते. तसेच यामुळे पित्तही कमी होते. तसेच त्वचा आणि केसांसाठीही गुलकंद पोषक मानले जाते. एक नैसर्गिक शितल पदार्थाचा आहारात समावेश केल्याने अनेक लाभ मिळतात.
आहारात हंगामी फळांचा समावेश करावा. उदा.उन्हाळ्यात आंबा हे सर्वात चांगले फळ आहे. कारण ते बी जीवनसत्वाने समृद्ध आहे, मज्जातंतूंना शांत करते आणि दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करते. त्याप्रमाणे प्रत्येक ऋतूमधील फळांचा आहारात समावेश करावा, असा सल्लाही रुजुता दिवेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा :