Mental Health Day : सुदृढ मनासाठी रोजच्या जगण्यात हे सोपे उपाय कराच… | पुढारी

Mental Health Day : सुदृढ मनासाठी रोजच्या जगण्यात हे सोपे उपाय कराच...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजार हा शारीरिकच असतो, अशी आपल्‍याकडे पक्‍की धारणा आहे. कारण आरोग्‍य म्‍हटलं की, प्रथम केवळ शरीराचा विचार केला जाताे. मात्र जागतिक आरोग्‍य संघटनेने आरोग्‍याची व्‍याख्‍या करताना , शरीराबरोबरच मनाचाही विचार तितकाच महत्त्‍वपूर्ण असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. ( World mental health day ) आरोग्‍य म्‍हणजे केवळ रोगाचा अभाव असे नाही तर मानसिक व सामजिक आरोग्‍याचाही विचार यामध्‍ये केला जातो. यावरुन मानसिक आरोग्‍याचे महत्त्‍व अधोरेखित होते.

मागील दीड वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा बसलाय. जगण्‍यावर अनेक निर्बंध आले. कोरोना महामारीने शारीरिक आरोग्‍याचे महत्‍व पटलं. मात्र विविध निर्बंधातून मानसिक आरोग्‍य बिघडविणारे ठरलं. त्‍यामुळेच आज शारीरिक आरोग्‍याबरोबर मानसिक स्‍वास्‍थाचाही विचार तितक़्‍याच गंभीरतेने होणे गरजेचे आहे. आज जागतिक मानसिक आरोग्‍य दिन. ( World mental health day ) मानसिक आरोग्‍यासंदर्भात जागृती निर्माण व्‍हावी, यासाठी हा दिन साजरा केला जातो. पाहूया, मानसिक स्‍वास्‍थ उत्तम ठेवणार्‍या काही टिप्‍स….

Mental Health Day : नेहमी सकारात्‍मक रहा

Mental Health Day
Mental Health Day

धावपळीच्‍या जीवनात प्रत्‍येकालाच विविध  समस्‍यांना आपल्‍याला सामोरे जावे लागते. हे एक आव्‍हानच असतं. अशावेळी सकारात्‍मक दृष्‍टीकोन ठेवणे आवश्‍यक आहे. यामुळे नकारात्‍मक भावना नियंत्रणात ठेवता येतात.

सकारात्‍मक विचार याचा अर्थ असा नाही की, तुम्‍ही कधीच निराश होणार नाही किंवा संतापणार नाही. आयुष्‍यातील विविध प्रश्‍न व समस्‍यांना सामोरे जाताना निराश होणे किंवा संतापणे साहजिकच आहे. मात्र याची तुम्‍हाला जाणीव होणे महत्‍वाचे आहे. सकारात्‍मक विचारातून तुम्‍ही कठीण प्रसंगांनाही मोठ्या धैर्याने तोंड देता. तसेच भावनांवर नियंत्रण ठेवू शकता.

नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा ( World mental health day )

Mental Health Day
Mental Health Day

तुम्‍ही जीवन जगताना अनेक जणांची मदत होत असते. तुमचे आयुष्‍य सुंदर करण्‍यासाठी पालक, नातेवाईकांबरोबरच समाजातील अनेक घटकांचा प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष वाटा असतो. याबद्‍दल नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा. मानसिक आरोग्‍य सदृढ ठेवण्‍यासाठी खूप लहान-लहान गोष्‍टींमधून तुम्‍ही आनंद घेवू शकता. उदा. तुम्‍हाला स्‍वादिष्‍ट भोजनाचा आनंद मिळाला तर तुम्‍ही सबंधितांचे आभार माना. यातून तुम्‍ही त्‍या क्षणाचा अधिक आनंद घेवू शकता. एखाद्‍याने मदत केली असेल तर संबंधितांचे मन:पूर्वक आभार माना. तुम्‍ही नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवली तर मानसिक आरोग्‍य सदृढ ठेवण्‍यास मदत होते.

आपल्‍या भावना व्‍यक्‍त करा

मनुष्‍य हा एक समाजिक प्राणी आहे, असे आपण अनेक वेळा वाचलं वा ऐकले असेल. तुमचे मानसिक आरोग्‍य निरोगी असेल तर तुम्‍ही अनेक लोकांशी जोडले जावू शकता. अशा व्‍यक्‍ती तणावग्रस्‍त घटनांना अधिक सक्षमपणे सामोरे जावू शकते. तसेच तुम्‍ही सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला तरी तुमचे मानसिक स्‍वास्‍थ चांगले राहण्‍यास मदत होते.

शारीरिक आरोग्‍याबरोबर मानसिक स्‍वास्‍थाकडेही लक्ष द्‍या

आपल्‍या आरोग्‍य म्‍हणजे सद्‍ढ शरीर असेच बहुतांश जण मानतात. मात्र शरीराबरोबरच तुम्‍ही तुमचे मानसिक स्‍वास्‍थाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मानसिक दृष्‍ट्या सक्षम व्‍यक्‍ती शारीरिक व्‍याधींचाही मोठा धैर्याने मुकाबला करु शकतो. त्‍यामुळे निरोगी शरीराचा पाया हा मानसिक सदृढता असल्‍याचे अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे तुम्‍ही शारीरिक व्‍याधींबरोबर आपल्‍या मनातील भावनांही तपासून मानसिकसृष्‍ट्या अधिक सक्षम होवू शकता.

नियमित व्‍यायाम करा ( World mental health day )

निरोगी शरीरासाठी तुम्‍ही नियमितपणे कोणताही व्‍यायाम करणे आवश्‍यक आहे. व्‍यायामामुळे तणाव कमी होण्‍यास मदत होते. तुमचा मूड अधिक चांगला होता. विविध रोगांपासून लांब राहण्‍यासही मदत होते. निरोगी मनासाठी तुम्‍ही शारीरिकदृष्‍ट्या निरोगी असणे आवश्‍यक आहे. यातूनच तुमची प्रतिकार शक्‍तीही वाढते. नियमित व्‍यायाम करण्‍यास आळस करु नका. निरोधी मनासाठी नियमित व्‍यायाम हा अत्‍यावश्‍यक ठरतो.

झोप अत्‍यावश्‍यक

तुम्‍हाला चांगली झोप लागत नसेल तर तुमची चिडचिड होते. तसेच तुम्‍ही शीघ्रकोपी होवू शकता. तुम्‍ही नैराश्‍यग्रस्‍त होण्‍याची धोका वाढतो. त्‍यामुळे दररोज ६ ते ८ तास शांत झोप घेणे आवश्‍यक आहे.

शांत झाेप लागत असल्‍यास शारीरिक व्‍याधी तर कमी हाेतातच. त्‍याच बराेबर मानसिक आराेग्‍यही सदृढ राहण्‍यास मदत हाेते, असे अनेक संशाेधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

अलिकडे जीवनशैलीत झालेल्‍या बदलांमुळे अनेकांना अनिद्रेचा त्रास हाेताे. अनिद्रेमुळे मानसिकदृष्‍ट्याही व्‍यक्‍ती कमकुवत हाेत असल्‍याचेही संशाेधनात आढळले आहे. त्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या झाेपेच्‍या वेळेकडे दुर्लश करु नका.  कारण  झोप हा आरोग्‍याचा पाया मानला जातो.

आहारही महत्‍वाचा

शारीरिकदृष्‍ट्या निरोगी राहण्‍यासाठी आहार महत्त्‍वपूर्ण ठरतो. त्‍याचबरोबर तुम्‍ही घेत असलेला आहारचा परिणाम मानसिक
स्‍वास्‍थावरही होतो. संतुलित आहात हा चिंता आणि तणाव कमी करण्‍यास मदत करतो. पोषक तत्‍व कमी असणारा आहार हा मानसिक रोगांना निमंत्रणच देत असतो. उदा. तुमच्‍या शरीरात व्‍हिटॅमिन बी १२ कमी झाले तर नैराश्‍याची भावना वाढते.
त्‍यामुळे संतुलित आहाराकडे लक्ष देण्‍याचा सल्‍ला डॉक्‍टर वारंवार देतात.

नियमित ध्‍यान करा

Mental Health Day
Mental Health Day

नियमित ध्‍यान ( मेडिटेशन ) केल्‍याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे असल्‍याचे वैद्‍यकीय संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहेत.

नियमित ध्‍यान केल्याामुळे मनावरील तणाव कमी होण्‍यास मदत, असे अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. ध्‍यान करण्‍याच्‍या अनेक पद्‍धती आहेत. याचा वापर करुन तुम्‍ही आपले मानसिक आरोग्‍य चांगले ठेवू शकता. मानसिक दृष्‍ट्या सदृढ राहण्‍यासाठी तुम्‍ही आपल्‍या जीवनशैलीत ध्‍यान समाविष्‍ट करा.

योगासन आणि प्राणायामचाही होतो फायदा

Mental Health Day
Mental Health Day

मन आणि शरीर दोन्‍ही निरोगी ठेवण्‍यासाठी योगा आणि प्राणायाम केल्याने खूपच फायदा होता, असे स्‍पष्‍ट झाले आहे.
सध्‍याच्‍या धावपळीच्‍या जीवनशैलीत योगा आणि प्राणयाम नियमितपणे करावे, असा सल्‍ला डॉक्‍टरही देवू लागले आहेत.
त्‍यामुळे मानसिक आरोग्‍य चागंले राहण्‍यासाठी प्राणायमाचा आपल्‍या जीवनशैलीत समावेश करा.

हेही वाचलंत का?

Back to top button