डेंग्यू जेव्हा फुफ्फुसांवर आक्रमण करतो, तेव्हा सुरुवातीला मोठ्या श्वासनलिकांवर परिणाम होतो. खोकला येणे, दम लागणे, धाप लागणे या लक्षणांबरोबर रुग्णाच्या खोकल्यातून रक्त पडू शकते. डेंग्यूची लक्षणे ताबडतोब ओळखून रुग्णांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला तर डेंग्यू आटोक्यात येतो. (Dengue and Respiratory Diseases )
संबंधित बातम्या
काही दिवसांपूर्वी चाळिशीतल्या एका गृहिणीने किरकोळ ताप आहे म्हणून सुरुवातीला स्वतःहून तापाची औषधे घेतली. नंतर डोकेदुखी, अंगदुखी वाढली म्हणून फॅमिली डॉक्टरांकडून दुसरी औषधे घेतली. तक्रारी सांगताना त्या फार तीव्र नाहीत – किरकोळ आहेत, या सबबीखाली रक्त तपासणी झाली नाही. तीन-चार दिवसांनंतर तक्रारी वाढत गेल्या. उलट्या सुरू झाल्या.
औषधांमुळे असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर खोकला आणि धाप अशा तक्रारी सुरू झाल्यानंतर त्या डॉक्टरांकडे पुन्हा गेल्या. त्यांनी तपासल्यानंतर तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले. रक्त तपासणी केल्यानंतर तो डेंग्यू असल्याचे लक्षात आले, पण तोपर्यंत डेंग्यूने तीव्र स्वरूप धारण केले होते. या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. डेंग्यू आटोक्यात आणून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली . आजकाल ग्रामीण भागात आणि अनेक शहरांतील उपनगरांत डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. म्हणूनच काळजी घ्यायला हवी.
डेंग्यूचा प्रसार
आपल्या घरात किंवा घराबाहेर अंगणात जे स्वच्छ पाणी असते, त्यात वाढणार्या आढळणार्या 'इडिस इजिप्ती' प्रकारच्या डासांच्या मादीमार्फत डेंग्यूच्या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे होतो. जेव्हा एखादा डास डेंग्यूने बाधित रुग्णाच्या रक्ताचे शोषण करतो, तेव्हा त्या डासामार्फत डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग, डासाच्या चाव्यातून निरोगी व्यक्तीमध्ये होतो. डेंग्यू हा आजार डासांमार्फतच पसरतो. तो एका व्यक्तीमधून दुसर्या व्यक्तीकडे संपर्कातून पसरत नाही.
डेंग्यूचे प्रकार
सौम्य डेंग्यू आणि तीव्र डेंग्यू असे डेंग्यूचे दोन प्रकार मानले जात असले तरी, वैद्यक परिभाषेनुसार त्याचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार करता येतात.
1) डेंग्यूचा ताप
लहान मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचा ताप असतो तर, प्रौढांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. डोके दुखणे, डोळे दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे अशा इतर तक्रारी दिसून येतात.
डेंग्यूमधील तीव्र स्वरूपाच्या अंगदुखीमुळे याला 'हाडेमोडी ताप' असेही म्हणतात. तीव्र तापाबरोबर डोक्याच्या पुढच्या भागातील दुखणे वाढते. डोळ्यांच्या मागील भागात वेदना होतात. या वेदना डोळ्यांच्या हालचालीसोबत वाढतात. भूक मंदावते, चव कमी होते. काही वेळा मळमळते. उलटी होते.
2) डेंग्यू रक्तस्रावाचा ताप
डेंग्यूचा हा प्रकार अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. रक्तातील प्लेटलेटस्ची संख्या कमी होत जाते. वर नमूद केलेल्या लक्षणांबरोबरच त्वचेवर अधिक लाल चट्टे, पुरळ उठतात. नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येते. अंतर्गत रक्तस्रावाचे इतर प्रकार आढळतात. आंतड्यांमधून रक्तस्राव होतो. अशा रुग्णांमध्ये फुफ्फुसात किंवा पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. सतत राहणारी तीव्र पोटदुखी होते. मळमळते. उलट्या होतात . उलटीतून रक्त पडते. तहान लागते. तोंड कोरडे पडते. श्वास घ्यायला त्रास होतो. रुग्णाचा अस्वस्थपणा वाढतो.
3) डेंग्यू अतिगंभीर आजार
हा डेंग्यूचा सर्वात तीव्र आणि धोक्याचा प्रकार आहे. डेंग्यूच्या पहिल्या आणि दुसर्या प्रकारात आढळणारी सर्व लक्षणे असतात. रुग्ण अधिक अस्वस्थ होत जातो. श्वासाचा वेग वाढतो. दम लागतो, धाप लागते, खोकला येतो. नाडीचा वेग मंदावतो. रक्तदाब कमी होतो. अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने उपचार करावे लागतात, अन्यथा रुग्ण अस्वस्थ होत जाऊन तो दगावू शकतो.
तातडीने उपचार हवेत
डेंग्यू जेव्हा फुफ्फुसांवर आक्रमण करतो, तेव्हा सुरुवातीला मोठ्या श्वासनलिकांवर परिणाम होतो. खोकला येणे, दम लागणे, धाप लागणे या लक्षणांबरोबर रुग्णाच्या खोकल्यातून रक्त पडू शकते. फुफ्फुसाच्या आवरणात पाणी होणे, न्यूमोनिया होणे, फुफ्फुसांमध्ये द्रव साचणे, फुफ्फुसांमध्ये रक्तस्राव होणे आणि 'एआरडीएस' म्हणजे वायुकोशांमध्ये द्रव साचून ऑक्सिजनच्या देवाणघेवाणाची क्रिया बाधित होणे, असे परिणाम दिसून येतात. अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये – अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून विनाविलंब उपचार करावे लागतात.
तक्रारीकडे दुर्लक्ष नको
डेंग्यूची लक्षणे ताबडतोब ओळखून रुग्णांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला तर, डेंग्यू आटोक्यात येतो. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे प्रवास वाढला आहे. त्यामुळे आजकाल अनेक जण, शनिवारी – रविवारी कुठेतरी प्रवासाला जातात. अनेकजण कमी वेळात लांब पल्ल्याचा प्रवास करतात. थोडक्यात प्रवासाच्या वेगाने डेंग्यू पसरू शकतो. डेंग्यूचा प्रसार करणार्या डासांची पैदास साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. स्वच्छ पाण्यावर नेहमी झाकण घालण्याची काळजी आपल्याकडील अनेक जण घेत नाहीत.
प्रचंड लोकसंख्या वाढ, शहरीकरण, स्वच्छतेचा अभाव, डास नियंत्रण नीटपणे न होणे, यामुळे डेंग्यू आटोक्यात येत नाही. डासांची वाढ होऊ नये किंवा पैदास होऊ नये, यासाठी डास नियंत्रण कार्यक्रम अत्यंत काटेकोरपणे व्हायला हवा . प्रत्येकाने व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळीवर, डास वाढू नयेत यासाठी दक्ष राहिले तर डेंग्यूचा प्रसार थांबेल. ( Dengue and Respiratory Diseases )