सावधान ! बदलत्या हवामानामुळे गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण | पुढारी

सावधान ! बदलत्या हवामानामुळे गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. काही ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन झालेले रुग्णदेखील आहेत. डेंग्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, याचा शरीरातील प्लेटलेट्सवर थेट हल्ला होतो. प्लेटलेट्स कमी झाल्याने अशक्तपणासह आरोग्यावर वेगवेगळे परिणाम जाणवत आहेत. झपाट्याने प्लेटलेट्सचे प्रमाण घटत जाऊन जीविताला धोका निर्माण होतो.

सध्याची रुग्णांची परिस्थिती पाहता लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला अशा आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राने परिसरामध्ये वाढत असलेल्या डेंग्यूवर उपाययोजना करणे काळाची गरज आहे. बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या गटारीतील पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, काही भागांत नदी असल्याने जलपर्णीमुळे देखील नदीकाठच्या नागरिकांना डासांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे, स्वच्छता राखणे व काही शारीरिक त्रास जाणवत असेल तर लगेच प्रथमोपचार घेणे गरजेचे असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन फटाले व डॉ. मनोज भोसले यांनी सांगितले.

ही घ्यावी काळजी

डेंग्यूवर प्रतिबंध घालायचा असेल तर घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याची डबकी तसेच मोकळे टायर ठेवू नयेत. जास्त पाणीसाठा असलेल्या मोठ्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, औषधांची फवारणी करावी आणि कोणी तापाने आजारी असल्यास तत्काळ जवळच्या दवाखान्यात उपचार घ्यावे.

ताप येणे, अशक्तपणा वाटणे, तोंडाला चव नसणे, थकवा जाणवणे आदी रुग्ण सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मात्र, काळजी करण्यासारखी स्थिती सध्या नाही.

– डॉ. अखिलेश राजूरकर, संचालक, गणेशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल

हेही वाचा

Back to top button