डेंग्यूचे रुग्ण महिनाभरात दुप्पट | पुढारी

डेंग्यूचे रुग्ण महिनाभरात दुप्पट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरामध्ये गेल्या महिनाभरात डेंग्यूचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. जुलै महिन्यात 36 बाधित रुग्ण आढळले होते. तर, ऑगस्टमध्ये तब्बल 52 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी ते जून अशा सहा महिन्यांत डेंग्यूचे एकूण 1102 संशयित रुग्ण आढळले. मात्र, या कालावधीत एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता.

दरम्यान, जुलै महिन्यापासून बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलैमध्ये 36 रुग्ण आढळले असताना ऑगस्टमध्ये मात्र ही संख्या दुपटीने वाढली. ऑगस्टमध्ये तब्बल 52 बाधित रुग्ण आढळले आहेत. दोन महिन्यांत एकूण 88 बाधित रुग्ण आढळले. जुलैमध्ये 1432 संशयित तर, ऑगस्टमध्ये 2145 संशयित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

हिवतापाचे सहा बाधित रुग्ण
ऑगस्ट महिन्यात हिवतापाचे (मलेरिया) 6 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी हिवतापाचे रुग्ण फेब्रुवारी (1), मे (3) आणि जून (5) अशा तीन महिन्यांतच आढळले होते. हिवतापाचे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण 15 बाधित रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुणियाचे जानेवारी महिन्यापासून ऑगस्टअखेर 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. तथापि, या आजाराचा आतापर्यंत एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

हेही वाचा :

पिंपरी : नागरी सुविधांअभावी रेड झोनमध्ये वाढला बकालपणा

पुणे : ‘पीएमआरडीए’ हद्दीतील प्रवाशांसाठीही मासिक पास

Back to top button