डेंग्यूविरुद्ध लढाईत मिळणार लक्षवेधी यश! | पुढारी

डेंग्यूविरुद्ध लढाईत मिळणार लक्षवेधी यश!

न्यूयॉर्क : डेंग्यू आजाराविरुद्ध सुरू असलेल्या प्रदीर्घ लढाईत आता मोठा दिलासा लाभेल, अशी चिन्हे आहेत. एका अमेरिकन कंपनीने डेंग्यूवर जालीम ठरेल, असे औषध तयार केले असून अलीकडेच त्याची मानवावर चाचणी करण्यात आली. ती यशस्वी ठरल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. डेंग्यूविरुद्ध लढण्यासाठी पहिली अँटिव्हायरल गोळी येथे तयार केली गेली असून या माध्यमातून रुग्णांना व्हायरसपासून वाचवणे शक्य होणार आहे.

जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील शास्त्रज्ञांनुसार, मानवी चाचणीसाठी 10 रुग्णांना निवडण्यात आले. त्यांना व्हॅक्सिनपूर्वी पाच दिवस आधी एक गोळी देण्यात आली. त्यानंतर 21 दिवसांपर्यंत गोळी दिली गेली. यात दहापैकी 6 रुग्णांच्या रक्तात व्हायरसशी संपर्कात आल्यानंतरही डेंग्यू व्हायरस आढळून आला नाही. याची एकूण 85 दिवसांपर्यंत देखरेख केली गेली. या औषधामुळे व्हायरसची प्रतिलिपी तयार होत नाही, असे संशोधनात आढळून आले.

सध्या या औषधाची दुसर्‍या टप्प्यात चाचणी सुरू असून याचा उद्देश चार वेगवेगळ्या प्रकारातील डेंग्यू रोखणे हा आहे. पुढील टप्प्यात उपचाराच्या माध्यमातून औषधाचे परीक्षण केले जाईल. यात हे औषध हमखास प्रभावी ठरले तर विभिन्न देशात देखील ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या देशात डेंग्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्या देशांना यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे संकेत आहेत. डेंग्यू हा डासापासून होणारा आजार आहे आणि त्यात येणारा ताप हा कोणत्याही लक्षणाशिवाय असतो. पहिल्या टप्यात सांधेदुखी सुरू होते. या आजारावर कोणतेही औषध किंवा लस आतापर्यंत उपलब्ध नव्हते. दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यूची लागण होते. अगदी भारतातच गतवर्षी 2.33 लाख लोकांना डेंग्यू झाला होता, हे देखील येथे लक्षवेधी आहे.

Back to top button