Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रात १४ की १५ जानेवारीला? जाणून घ्या विधी आणि महत्त्‍व | पुढारी

Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रात १४ की १५ जानेवारीला? जाणून घ्या विधी आणि महत्त्‍व

वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकर संक्रांती हे नाव आहे. पाैष मासात ही संक्रांती येते. जुन्या ग्रह लखवी पंचांगाप्रमाणे मकर संक्रांती १४ जानेवारीला येते, तर शुद्ध निरयन (टिळक) पंचांगाप्रमाणे ती १० जानेवारीला एकसण व एक पुण्यपर्व या दोन्ही दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे. हा उत्तरायणाचा आरंभ दिवस असतो. म्हणून या संक्रांतीला अयन संक्रांती, असेही म्हणतात. या संक्रांतीचा पुण्य काल, ती दिवसा असेल, तर पुढील ४० घटका व रात्री असेल, तर दुसर्‍या दिवशी असतो. त्या कालात समुद्रस्नान किंवा गंगादि नद्यांचे स्नान व दान विशेष पुण्यप्रद असते, असे सोलापूरचे वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी यांनी सांगितले. (Makar Sankranti 2024)

या दिवशी काय करावे, हे सांगताना हेमाद्रीने लिहिला श्लोक

धेनुं तीलमयी राजन् दद्याद्यश्चोत्तरायणे ।
सर्वान्कामान्वाप्नोति विंदते परमं सुखम् !!

अर्थ : जे मनुष्य उत्तरायणात (मकरसंक्रांतीचे दिवशी) तिलमय धेनूचे दान करतो. त्याला सर्व काम प्राप्त होतात. व तो परमसुख पावतो. शिव रहस्यात त्यासाठी पुढील विधी सांगितला आहे. Makar Sankranti 2024

तस्यां कृष्णतिलैः स्नानं कार्यंचोद्वर्तनंशुभैः।
तिला देयाश्च विप्रेभ्यः सर्वदैवौत्तरायणे ॥
तिल तैलेन दीपाश्च देयाः शिवगृहे शुभाः ॥

अर्थ : मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांचा कल्क लावून तिळयुक्त उदकाने स्नान करावे, उत्तरायणात नेहमी ब्राह्मणांना तीळ दान द्यावे. व शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत. या दिवशी पितृश्राध्द करावे, असेही सांगितले आहे. संक्रांतीच्या दानादिकृत्यांची महती

देवीपुराणात वर्णिली आहे, ती अशी –
संक्रांती यानी दत्तानि हव्यकव्यानिमानवैः ।
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि ॥

अर्थ : मकरसंक्रांतीच्या दिवशी माणसे जी दाने देतात व हव्यकव्ये करतात, त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मकर संक्रांती हा सण बहुतेक संपूर्ण भारतात पाळला जातो. या दिवशी घरच्या व गावच्या देवाला तीळ, तांदुळ वाहतात. सौभाग्यवती स्त्रिया ब्राह्मणालासुगड (सुघट) दान करतात. या सुगडात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, द्रव्य इत्यादी वस्तू घालतात. नववधूच्या पहिल्या वर्षी तिच्याकडून तेल, जिरे, मीठ व कापूस हे जिन्नस सुवासिनींना देववितात. या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने करून घालणे व जावयास तिळगुळ आणि आहेर पाठवणे किंवा देणे, अशी चाल महाराष्ट्रात आहे.

Makar Sankranti 2024 : कोकणात सुवासिनी स्त्रिया दुसर्‍याच्या अंगणात तांदुळ नेऊन वैरतात

कोकणात सुवासिनी स्त्रिया दुसर्‍याच्या घरच्या आंगणात आपल्या घरचे तांदुळ नेऊन वैरतात (घालतात). दुसर्‍या घरी उंबरठ्याच्या आत खेळणा-रांगणा म्हणून असोला नारळ सोडतात. या संक्रांतीला तळलेले पदार्थपक्वान्न करायचे नाही, असा संकेत आहे. म्हणून कोकणात त्या दिवशी इडली व तिच्या जोडीला गुळ घालून नारळाचा रस हे पक्वान्न करतात. देशावर गुळाच्या पोळ्या करण्याची पद्धत आहे. या दिवसासाठी तिळावर साखरेचा पाक चढवून काटेदार हलवा करण्याची पद्धत आहे. बायका या दिवशी साजशृंगार करून हळदीकुंकू करतात व सुवासिनींना तिळगुळ वाटतात. कित्येक स्त्रिया या हळदी कुंकुवाच्या दिवशी एखादा पदार्थ करतात. पुरुष मंडळी आप्तेष्टांना तिळगुळ देण्यासाठी घरोघरी जातात. तिळगुळ मोठ्यांनी लहानांना द्यायचा असा संकेत आहे. हा तिळगुळ देताना ’तिळगुळ घ्या गोड बोला’ असे म्हणतात. त्यादृष्टीने जुनी भांडणे किंवा किल्मिषे संपवून पुनःश्च स्नेह किवा गोडी निर्माण करणे, यासाठी या सणाचा उपयोग केलेला आहे.

दक्षिण भारतात या दिवशी खीर करतात. उत्तर भारतात खिचडी बनवतात. त्या प्रदेशात या दिवशी भावजय आपल्या नणंदेला वस्त्र, फल, मिष्टान्न, तीळ, डाळ व तांदूळ उपहार म्हणून पाठवते. लोकभाषेत या उपहाराला ’संकरात देना’ असे म्हणतात.

हिमालयाच्या सखल भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून तुपात तळतात

हिमालयाच्या सखल भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसर्‍या दिवशी ते कावळ्यांना खाऊ घालतात. बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळवा नावाचा पदार्थ तयार करतात. व तो इष्टमित्रांना देतात. याशिवाय तांदुळाच्या पिठात तूप, साखर मिसळून पिष्टक नावाचे खाद्य तयार करतात व तेही वाटतात. या दिवशी गंगास्नानासाठी प्रयाग येथे मोठी यात्रा भरते. दक्षिणेतही तिन्नेवेल्ली जिल्ह्यातून वाहणार्‍या ताम्रपर्णी नदीत स्नान करण्यासाठी व वेदारण्यम येथे समुद्र स्नानासाठी मोठी यात्रा भरते.

संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव

संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. यादृष्टीने उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील आगळे महत्त्व आहे. तमसो मा ज्योतिर्गमय- अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना ह्या दिवसाच्या संकल्पित प्रयत्नाच्या परंपरेने साकार होणे शक्य आहे. कर्मयोगी सूर्य स्वतःच्या क्षणिक प्रमादाला झटकून अंधःकारावर आक्रमण करण्याचा यादिवशी दृढ संकल्प करतो. या दिवसापासून अंधार हळूहळू कमी कमी होत जातो. चांगली कामे करायला या शुभ दिवसाने सुरुवात हाते.

Makar Sankranti 2024 : योगी व धार्मिक हिंदू मकर संक्रांतीनंतर  मृत्यू येण्यासाठी जप करतात

योगी व धार्मिक हिंदू मकर संक्रांतीनंतर स्वतःला मृत्यू यावा. असा जप करीत असतात. कृतांत यमराजाला उत्तरायणापर्यंत थांबवून धरणारे भीष्म पितामह ह्या संबंधीचे ज्वलंत उदाहरण आहे. मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंध:कारावर विजय. मानवाचे जीवनही अंधःकार व प्रकाश ह्यांनी वेष्टिलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्रकाळ्या व पांढर्‍या तंतूंनी विणले आहे. आजच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभसंकल्प करावयाचा असतो. संक्रांत म्हणजे सम्यक् क्रांती. क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाची आकांक्षा असते, तर संक्रांतीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी केवळ संदर्भ नाहीत, तर मानवी मनाचे संकल्पही बदलले पाहिजेत. हे विचार क्रांतीने शक्य आहे. क्रांतीमध्ये हिसेंला महत्त्व असू शकते. संक्रांतीमध्ये समजुतीचे साम्राज्य पसरलेले असते. माणसाने या दिवशी सम्यक् युक्त होण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा : 

Back to top button