Makar Sankranti : मकर संक्रांत आणि उत्तरायण | पुढारी

Makar Sankranti : मकर संक्रांत आणि उत्तरायण

सुरेश पवार

भारतीय संस्कृतीत सणवारांना महत्त्वाचे स्थान आहे. आपले बहुतेक सण हे कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा या सणांप्रमाणे संक्रांत हा महत्त्वाचा सण! मकर संक्रांत हा सण सृष्टीचक्रातील, निसर्ग चक्रातील एका महत्त्वाच्या घटनेशी संबंधित आहे. ही घटना म्हणजे या सणाच्या तारखेपासून सुरू होणारे उत्तरायण.

मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. दिवस मोठे होतात. रात्री लहान होत जातात आणि कर्कायन संक्रांतीला म्हणजे 23 जूनला सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. दिवस लहान होत जातात आणि रात्रीचा कालावधी वाढत जातो.

आर्य लोकांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, असे म्हटले जाते. ध्रुव प्रदेशात सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असे सृष्टीचक्र असते. उत्तरायणापासून तेथे दिवस सुरू होतो. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहाचा आणि आनंदाचा मानला जाई. संक्रांत सणाचे मूळ यामध्ये असावे, असे म्हटले जाते. महाभारतातील अश्वमेध पर्वात उत्तरायण व शिशिर ऋतूचा प्रारंभ यांचा संबंध दर्शवलेला आहे.

राशिचक्रात बारा राशी आहेत. सूर्याचा जो भासमान वार्षिक गती मार्ग, त्याला क्रांतीवृत्त म्हणतात. स्थिर तार्‍यापासून या क्रांतीवृत्ताचे बारा भाग केलेले असतात. त्या या बारा राशी. या राशी तारकासापेक्ष स्थिर असतात. सध्या या चक्राच्या आरंभ बिंदूपासून वसंत संपात बिंदू हा 23 अंश 36 कला एवढा पश्चिमेकडे सरकलेला आहे. दर 70 ते 72 वर्षांनी हा बिंदू पश्चिमेकडे एक अंश सरकत आहे. सुमारे 80-90 वर्षांपूर्वी मकर संक्रांत 13 जानेवारीला येत होती. गेल्या 3-4 वर्षांपर्यंत ती 14 जानेवारीला येत होती. आता मकर संक्रांत 15 जानेवारीला येत आहे. वसंत संपात बिंदूच्या अयनामुळे हा फरक पडतो आहे.

भारतीय सांस्कृतिक जीवनात मकर संक्रांतीला महत्त्व आहे. देवीने संक्रांतीला संकरासुर या दैत्याचा वध केला आणि किंक्रांतीला किंकरासुराला यमसदनाला धाडले अशी कथा आहे. महाराष्ट्रात संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून साजरा होतो. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत. या दिवसाला करीदिन म्हणतात व तो सर्वसाधारणपणे अशुभ मानला जातो.

मकर संक्रांत सण सार्‍या देशभर मोठ्या उत्साहाने साजरा होतो. उत्तर भारतात हा उत्साह विशेषच असतो. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक. स्वाभाविकच उत्तरायणापासून दिवस मोठा होणार असल्याने संक्रांतीला महत्त्व दिले जाते. या दिवशी डाळ आणि तांदूळ यांची खिचडी केली जाते. बंगाल प्रांतात काकवीत तीळ घालून गोड पदार्थ केला जातो. तांदळाच्या पिठात तूप साखर घालूनही गोड पदार्थ बनवला जातो. संक्रांतीला इथे ककुआ संक्रांत अथवा पिष्टक संक्रांत म्हटले जाते. दक्षिणेत पोंगल म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

प्रयाग आणि गंगासागर येथे संक्रांतीला मोठी यात्रा भरते. लाखो लोक स्नानासाठी येतात. या दिवशी पितृश्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते.

सामाजिक अभिसरण

महाराष्ट्रात लहानांना ज्येष्ठांकडून तिळगूळ वाटप होते. महिला सौभाग्य वाण देतात. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणून स्नेहाचे बंध घट्ट केले जातात. कुटुंबाप्रमाणे मित्रमंडळ, स्नेहीजनांना, लहान-थोरांना तिळगूळ दिले जाते. एकप्रकारे सामाजिक अभिसरणाला चालना देणारा हा सण आहे.

कृषी संस्कृतीच्या खुणा

या काळात शेतीची कामे संपलेली असतात. नवे पीक हाती आलेले असते. त्याचाही या सणात आविष्कार झालेला दिसतो. प्राचीन कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या सणात दिसून येतात.

आरोग्याशी सांगड

संक्रांतीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण आणि आरोग्यदायी. आपल्या पूर्वजांनी या सणाची सांगड आरोग्याशीही घातलेली आहे.

Back to top button