India’s Economic Progress : भारताच्या आर्थिक प्रगतीचे चिनी ग्लोबल टाइम्सकडून कौतुक

India’s Economic Progress : भारताच्या आर्थिक प्रगतीचे चिनी ग्लोबल टाइम्सकडून कौतुक
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चिनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या बीजिंगस्थित ग्लोबल टाइम्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारताच्या आर्थिक प्रगतीचे, सामाजिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंधात झालेल्या प्रगतीची प्रशंसा केली आहे. चीनमधील प्रमुख  प्रसारमाध्यमांमध्ये  असलेल्या या वृत्तपत्रात अशी प्रशंसा प्रसिद्ध होणे दुर्मीळ मानली जाते.
शांघाय येथील फुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी  हा लेख लिहिला आहे. यात गेल्या चार वर्षांतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. भारताचा आर्थिक विकास, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि विशेषत: चीनसोबतच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या दृष्टिकोनातील बदलाचे यात कौतुक करण्यात आले आहे. चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असंतुलनावरील चर्चेत, भारतीय प्रतिनिधी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचे. पण आता ते भारताची निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत, असे लेखकाने म्हटले आहे.
या लेखात  भारताच्या धोरणात्मक आत्मविश्वासावर भर  देण्यात आला असून "भारत नॅरेटिव्ह" ला प्रोत्साहन देणाऱ्या   भारताच्या सक्रिय दृष्टिकोनाचे कौतुक करण्यात आले आहे.  वेगवान आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे ' भारत नॅरेटिव्ह' निर्माण  करण्यात भारत धोरणात्मक दृष्ट्या अधिक सक्रिय झाला आहे. राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताने पाश्चिमात्य देशांच्या लोकशाहीच्या संकल्पनेचे अंधानुकरण करण्याऐवजी, लोकशाहीवादी राजकारणाशी जोडलेली 'भारतीय वैशिष्ट्य' अधोरेखित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हे परिवर्तन, ऐतिहासिक वसाहतवादी छायेतून  बाहेर पडण्याची तसेच राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक प्रभावशाली म्हणून स्वतःचे  स्थान  निर्माण करण्याची  भारताची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते,असे मत लेखकाने ठामपणे मांडले आहे.
या लेखात रशिया-युक्रेन संघर्षात भारताची भूमिका मांडताना बहुस्तरीय सहकार्य दृढ करणारा भारताचा दृष्टीकोन आणि अमेरिका, जपान आणि रशियासारख्या प्रमुख जागतिक शक्तींशी संबंध बळकट करण्यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी यांच्या  नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणाची ही लेखकाने प्रशंसा  केली आहे.
प्राध्यापक झांग यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून, त्यांनी अमेरिका, जपान, रशिया आणि इतर देश आणि प्रादेशिक संघटनांशी भारताचे संबंध वाढवून बहु- सहाय्य धोरणाचा पुरस्कार केला आहे.भारताने नेहमीच स्वतःला जागतिक शक्ती मानले आहे, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.  बहु-संतुलन ते बहु-सहाय्य या भूमिका बदलाला भारताला केवळ दहा वर्षे झाली आहेत , आणि तरीही भारताची बहुध्रुवीय जगात एक अग्रणी बनण्याच्या धोरणाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
एक बदललेला,बलशाली आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण भारत हा एक नवीन भू-राजकीय घटक बनला आहे ज्याचा अनेक देशांनी विचार करणे आवश्यक आहे, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news