Digestive problems : पचनाच्या समस्या | पुढारी

Digestive problems : पचनाच्या समस्या

डॉ. मेघराज इंगळे

पावसाळ्यात फक्त त्वचा, डोळे किंवा सांधेच नाही तर जठरासंबंधी समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये काळजी घेणे आणि जठरासंबंधी समस्या दूर ठेवणे आवश्यक आहे. (Digestive problems)

पावसाळ्यात आतड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. (Digestive problems)

उच्च आर्द्रता, दूषित पाणी आणि अन्न यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगणे, जठरासंबंधी समस्या जाणवणे, आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा समस्या होतात. शिळे किंवा खराब झालेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.

साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते. दूषित पाणी वापरल्याने अतिसार आणि पोटाच्या संसर्गास आमंत्रण मिळते.

गॅस्ट्रोएन्टेरिटीस किंवा पोटाचा फ्लू ही देखील आणखी एक समस्या आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक्ट, पोट आणि आतड्यांची जळजळ होते. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित लोकांच्या संपर्कात येते किंवा दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करते तेव्हा त्या व्यक्तीस संसर्गाचा धोका असतो. जुलाब, उलट्या, पोटदुखी, वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी ही त्याची लक्षणे आहेत.

गॅस्ट्रिक समस्या टाळण्यासाठी

प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करावा : आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त ठरतात. दही, ताक यांचा आहारात समावेश करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञाची मदत घ्या.

पुरेसे पाणी प्या : पचनास मदत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दररोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे लक्षात ठेवा की शरीर ओव्हरहायड्रेट करू नका. कारण ते देखील आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

कच्च्या भाज्या खाऊ नका : वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्यांचे खाणे पचनासाठी योग्य ठरते. कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असू शकतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

न शिजविलेले सी फूड खाणे टाळा : पावसाळ्यात पाणी दूषित असल्याने कच्चे सी फूड खाल्ल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि हवाबंद डब्यातील अन्नाचे सेवन करणे टाळा.

शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळावे : आईस्क्रीम, चॉकलेट, कँडी, मिठाईचे सेवन कमी करा ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते आणि आतड्याला त्रास होऊ शकतो.

Back to top button