समस्या बहिरेपणाची; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय | पुढारी

समस्या बहिरेपणाची; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

डॉ. मनोज शिंगाडे

वय वाढणे, काही विशिष्ट प्रकारची औषधे, जीवाणूंचा संसर्ग, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन यासारखे आजार तसेच मेनिन्जायटिस, गोवर, गलगंड इत्यादी आजारांचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. तसेच मोठ्या किंवा तीव्र आवाजाच्या संपर्कात सतत राहणे हे देखील एक कारण आहे.

कानाचे तीन भाग असतात. बाह्य कान, मध्य कान आणि अंतर्गत कान. बाह्य कान वातावरणातून ध्वनितरंगांच्या रूपाने आवाज ग्रहण करतो. हे तरंग कॅनलमधून जाऊन इअर ड्रमपर्यंत पोहोचतात. त्यामुळे इअर ड्रम कंप पावू लागतो. या कंपनांमुळे मध्य कानात असणार्‍या तीन अतिशय छोट्या हाडांमध्ये गती निर्माण होते आणि या गतीमुळे कानातील अंतर्गत भागात असणारे द्रव हलणे सुरू होते. आतील कानात हिअर सेल्स अर्थात ऐकण्याची क्षमता असणार्‍या पेशी असतात. त्या या द्रवाच्या गतीमुळे थोड्या वळतात आणि इलेक्ट्रिक पल्सच्या रूपात मेंदूकडे संदेश पोहोचवतात. हा संदेश आपल्याला शब्द आणि ध्वनीच्या रूपात ऐकू येतो.

नुकसान होण्याचे प्रकार ः हिअरींग लॉस म्हणजे ऐकू येण्यातील दोष होय. ते दोन प्रकारचे असू शकते.

1) कंडक्टीव्ह हिअरींग लॉस ः कानाच्या बाहेरील आणि मधल्या भागातून आलेल्या एखाद्या समस्येमुळे ही प्रक्रिया घडतेे. याला आजारपणामुळे होणारे बहिरेपण देखील म्हणतात. याची कारणे म्हणजे कानातून पू वाहणे किंवा संसर्ग होणे, कानांच्या हाडात काही गडबड होणे, कानाच्या पडद्याचे नुकसान होणे म्हणजे त्याला छिद्र पडणे किंवा गाठ होणे.

2) सेन्सरी न्युरल हिअरींग लॉस : आतील भागात निर्माण झालेल्या बिघाडामुळे ही समस्या उद्भवते. हिअर सेल्स नष्ट होऊ लागतात किंवा योग्य प्रकारे काम करू शकत नाही, तेव्हा असे होते. कानात जवळपास 15 हजार विशिष्ट हिअरींग सेल्स असतात. त्यानंतर मज्जातंतू असतात. त्यांच्यामुळेच आपण ऐकू शकतो. वय वाढते तसे या पेशी क्षीण आणि नष्ट होऊ लागतात. त्यामुळे मज्जातंतूही कमकुवत बनून ऐकण्याची शक्ती कमी होते.

वय वाढणे, काही विशिष्ट प्रकारची औषधे, जीवाणूंचा संसर्ग, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन यासारखे आजार तसेच मेनिन्जायटिस, गोवर, गलगंड इत्यादी आजारांचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. तसेच मोठ्या किंवा तीव्र आवाजाच्या संपर्कात सतत राहणे हे देखील एक कारण आहे. सामान्यतः, ऐकण्यासाठी आपल्याला काही अडचण येत आहे हे समजते तोपर्यंत आपल्या 30 टक्के पेशी नष्ट झालेल्या असतात.

लक्षणे : ऐकण्याची क्षमता कमी होण्याची सुरुवातीची लक्षणे फारशी सुस्पष्ट नसतात. मात्र, ऐकण्याच्या क्षमतेत आलेली कमतरता काळानुसार आणखी कमी होत जाते याकडे लक्ष द्यावे. अशा वेळी शक्य तितक्या लवकर इलाज केला पाहिजे. सामान्य बोलणे ऐकण्यात अडचण होत असेल तर डॉक्टरांना भेटणे इष्ट ठरते.

संसर्गामुळे ऐकण्याची क्षमता कमी झाली असेल तर औषधाने ती बरी करता येते. पडदा डॅमेज झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. बरेचदा यावर औषधांनीही उपचार होऊ शकतो. मज्जातंतूंचे नुकसान झाले असेल तर ते बरे करता येत नाही. अशा वेळी हिअरींग एडचा वापर करता येऊ शकतो. यामुळे त्वरित उपचार होतो आणि समस्येत वाढ होणे रोखता येऊ शकते. हिअरींग एडचा वापर केला नाही तर मज्जातंतूंवरील ताण वाढतो आणि समस्या वाढत जाते. ऐकण्याची क्षमता जन्मतःच कमी असण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक मुलाच्या ऐकण्याच्या क्षमतेची तपासणी केली पाहिजे.

यासाठी नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. 6 महिन्यांपर्यंत मूल आवाजाकडे लक्ष देत नसेल किंवा दोन वर्षे वयापर्यंत एकही शब्द बोलू शकत नसेल तर त्वरित तपासणी करावी. पाच वर्षांपर्यंत मुलांच्या ऐकण्याच्या, समजण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेचा पूर्ण विकास होतो. त्यासाठी याच वयापर्यंत त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली तर चांगले असते.

ऐकण्याची क्षमता कशी चांगली राखाल?

जन्मतःच मुलांच्या कानांची तपासणी करावी. 45 वर्षांनंतर कानांची नियमित तपासणी करावी. अधिक आवाजाच्या ठिकाणी काम करत असल्यास कानांना संरक्षण कवच वापरावे. त्यासाठी इअर प्लगचा वापर करावा. 90 डेसिबलपेक्षा कमी आवाज कानांसाठी ठीक असतो; मात्र यापेक्षा जास्त आवाज नुकसानदायक असतो त्यापासून दूर रहावे. हेडफोनद्वारे किंवा इअर बडच्या मदतीने जास्त काळ ऐकू नये. यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. संगीत ऐकताना आवाज नेहमी मध्यम किंवा कमी ठेवावा.

ऐकण्याची क्षमता चांगली राहाण्यासाठी अनुलोम, विलोम, कपालभाती, भस्त्रिका आणि भ्रामरी प्राणायाम अतिशय लाभकारी आहे. यामध्ये भ्रामरी विशेष लाभदायक ठरते.

हेही वाचा : 

Back to top button