Diabetes and Skin Problems : मधुमेह आणि त्वचेच्या समस्या, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Diabetes and Skin Problems : मधुमेह आणि त्वचेच्या समस्या, जाणून घ्‍या सविस्‍तर

डॉ. शरीफा चौसे

मधुमेह हा असा आजार आहे, ज्याचा केवळ हृदय, मूत्रपिंड, यकृत, डोळे आणि रक्तवाहिन्या किंवा पायांवरच नाही, तर त्वचेवरही तितकाच परिणाम होतो. मधुमेहाचे रुग्ण असाल, तर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीची नोंद ठेवणे, तसेच त्वचा आणि नखांमध्ये काही बदल दिसून आला तर त्याकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे. (Diabetes and Skin Problems )

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असते, तेव्हा मधुमेह होतो. मधुमेह हा त्वचेच्या आजारांनादेखील आमंत्रण देतो आणि असलेल्या आजारांतील गुंतागुंत वाढवतो. रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्ताभिसरण प्रक्रिया बिघडवते आणि रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम करून त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करते. परिणामी, पांढर्‍या रक्तपेशी संक्रमणाशी लढण्यासाठी अकार्यक्षम होतात. मंदावलेला रक्तप्रवाह त्वचेच्या बरे होण्याच्या क्षमतेला बाधा आणतो आणि त्वचेच्या कोलेजनलादेखील हानी पोहोचवतो, त्यामुळे त्वचा खराब होते.

Diabetes and Skin Problems : त्वचेच्या समस्या

टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींना सोरायसिस विकसित होण्याचा धोका अधिक असतो. हा आजार त्वचेवर चट्टे, खपली आणि खाज सुटणार्‍या ठिपक्यांप्रमाणे दिसून येतो.

कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा

मधुमेहामुळे पायाच्या कोरड्या त्वचेवर अधिक परिणाम होतो. कोरड्या त्वचेला सतत खाज सुटल्याने तिला भेगा पडू शकतात. त्वचेमध्ये संक्रण प्रवेश करते, ज्यामुळे जळजळ, लालसरपणा दिसून येतो. मधुमेहींना बुरशीजन्य संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. अनेकदा लालसर, खाज सुटलेल्या पुरळ आणि फोडांसह शरीराच्या काही ठरावीक भागांमध्ये जसे की बोटे, कोपर किंवा काखेत आणि ओठांच्या कडा यामध्ये इन्फेक्शन दिसतात.

बुरशीजन्य संसर्गामध्ये कॅन्डिडा अल्बिकन्स, रिंगवर्म्स, ऍथलीटस् फूट, जॉक इच आणि वारंवार योनीमार्गाचे यीस्ट इन्फेक्शन यांचा समावेश होतो. जिवाणू संसर्गात त्यांना फोड, फॉलिक्युलायटिस, पापण्यांवर डाग आणि नखांभोवती संक्रमण आढळून येते. नेक्रोबायोसिस लिपोइडिका हे मधुमेहाचे एक लक्षण आहे, ज्यामध्ये त्वचेवर लहान-लहान वाढलेले दाणे दिसतात, जे मुरुमांसारखे दिसतात. नंतर ते डागांचे रूप घेतात, जे पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे असू शकतात.

मानेवर, काखेत, जांघा, मांड्या किंवा इतर भागांवर काळपट डाग दिसत असतील, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुमच्या रक्तात इन्सुलिन जास्त आहे. हे बहुधा प्री-डायबिटिजचे लक्षण असते. वैद्यकीय भाषेत याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात.

डिजिटल स्केलेरोसिस – याचा डिजिटल उपकरणांच्या अत्याधिक वापराशी संबंध नाही; परंतु त्याची लक्षणे त्यांच्या वापरात अडथळा आणू शकतात. यामध्ये बोटांची आणि हातांची त्वचा कडक किंवा जाड होते. यामध्ये बोटे कडक होऊ शकतात आणि त्यांची हालचाल करणे कठीण होऊ शकते. मधुमेहावर योग्य उपचार न केल्यास ही समस्या उद्भवू शकते. हीच गोष्ट पाठीवर, खांद्यावर आणि मानेवरदेखील विकसित होते.

बुलोसिस डायबिटीकोरम म्हणजे हाताची, तसेच पायाची बोटे किंवा पाठीवर फोड येणे, जे एक किंवा अनेक असू शकतात. हे फोड सामान्यत: वेदनारहित असतात आणि काही आठवड्यांत स्वतंत्रपणे बरे होतात.

त्वचेची काळजी

मधुमेहींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करावे. संतुलित आहाराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून नियमितपणे व्यायाम करावा. त्वचेच्या दुमडणार्‍या भागांकडे, विशेषत: पायाच्या बोटांमधली जागा, स्तनांखालील, काखेतील आणि मांडीच्या आसपासच्या भागाकडे विशेष लक्ष ठेवावे. आपली त्वचा स्वच्छ आणि कोरडी राहील याचा प्रयत्न करावा. शरीराची नियमित तपासणी केली पाहिजे. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे. कोणत्याही जखमांकडे त्वरित लक्ष द्यावे. भरपूर पाणी प्यावे.

Back to top button