सोशल मीडिया ॲप्स सातत्‍याने ‘स्क्रोल’ करणे घातकच : जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते? | पुढारी

सोशल मीडिया ॲप्स सातत्‍याने 'स्क्रोल' करणे घातकच : जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍मार्टफोन आला आणि आपल्‍या सर्वांच्‍या जगण्‍याचं सारं सूत्र बदललं. मागील काही वर्षांमध्ये स्‍मार्ट फोनमधील ॲप्‍स आणि आपलं जगणं काहीसं समांतर झालं आहे. मेसेज, रिल्‍स, व्‍हिडीओ आणि क्षणक्षणाला  बदलणार्‍या संपूर्ण जगाची अपडेट देणार्‍या या ॲप्‍सच्या मोहात लहानपासून थोरांपर्यंत सारेच न पडतील तर नवल. ( Social Media Apps ) आपल्‍या जगण्‍यातला फुरसतीचे क्षण असो की तणावाचे बहुतांश क्षण या ॲप्‍सनेच काबीज केले आहेत. जसे कोणत्‍याही गोष्‍टीचे फायदे असतात तसेच मुकाटपणे त्‍याचे तोटेही स्‍वीकारावे लागतात. सोशल मीडिया ॲप्‍सचही असेच आहे. यासंदर्भात झालेल्‍या नवीन संशोधनात सोशल मीडिया ॲप्‍स सातत्‍याने स्क्रोल केल्‍याने आपल्‍या जगण्‍यावर कोणते दुष्‍परिणाम होतात यावर प्रकाश टाकला आहे. जाणून घेवूया या संशोधनाविषयी….

सोशल मीडिया ॲप्‍स सातत्‍याने स्क्रोल केल्‍याने आपल्‍या जगण्‍यावर नेमका कोणता परिणाम होतो, यावरील संशाेधनाचा लेख ‘जर्नल बिहेव्‍हियर अँड इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी’ या नियतकालिकेत  प्रकाशित झाला आहे. या संशोधनात सोशल मीडियाचा अधिक वापर करणार्‍या १८ ते ३४ वयोगटातील २८८ जणांनी सहभाग घेतला.

Social Media Apps : असे झाले संशोधन ?

Social Media Apps

या संशोधनात सोशल मीडिया युजर्सचे ( वापरकर्ते) तीन गटात वर्गीकरण करण्‍यात आले. पहिल्‍या गटात निष्‍क्रिय वापरकर्ते होते. म्‍हणजे सोशल मीडिया ॲप्‍सचा वापर केवळ इतर वापरकर्त्यांनी केलेल्‍या रिल्‍स, व्‍हिडिओ आणि पोस्‍ट वाच‍‍‍णारे होते. दुसरा गटामध्‍ये वापरकर्ता हा स्‍वत : सोशल मीडियावर पोस्‍ट करतो; परंतू इतर वापरकर्त्यांच्‍या पोस्‍ट, रिल्‍स आणि व्‍हिडिओ पाहत नाही. म्‍हणजे हा वापरकर्ता व्‍यक्‍तिगत पातळीवर सक्रिय असतो ताे सामाजिक दृष्‍ट्या अलिप्‍त राहतो. तिसर्‍या गटामध्‍ये अशा व्‍यक्‍तींचा समावेश होतो जे स्‍वत: पोस्‍ट करत आणि इतर वापरकर्त्यांशी संवादही साधत होते. या संशोधनाचा हेतू हा सोशल मीडियाच्‍या विविध स्‍वरुपातील व्‍यस्‍तता, यामुळे ये‍‍‍णारी एकाकीपणाची भावना आणि युजर्संना होणार मानसिक त्रास यांच्‍यातील नेमका दुवा कोणता हे शोधणे होते.

निष्‍क्रिय वापरकर्त्यांसाठी धोक्‍याची घंटा

निष्क्रिय सोशल मीडिया वापरामध्ये अधिक वेळ घालवणारे वापरकर्ते हे चिंता, नैराश्य आणि तणावाला सामोरे जावे लागते, असे या संशोधनात आढळले. असे वापरकर्ते हे सक्रियपणे पोस्‍ट न करता केवळ इतरांच्‍या रिल्‍स, व्‍हिडीओ आणि पोस्‍ट स्‍क्रोल करत राहतात. त्‍यांना एकाकीपणा, तणाव आणि नैराश्‍याच्‍या भावना वाढतात. त्‍याचे कारण शॉर्ट व्‍हिडिओ, मीम्‍स आणि इतर सोशल मीडियावर उपलब्‍ध असणारी माहिती ही नेटिइन्‍ससाठी अल्‍पकालीन आनंदाचे स्रोत बनले आहेत. या ॲप्‍सवरील रिल्‍स, व्‍हिडिओ हे वापरकर्त्यांचे मनोरंजन करते आणि त्‍याला अनेक तास या ॲप्‍समध्‍ये गुंतवणूक ठेवते. त्‍यामुळे निष्‍क्रिय सोशल मीडियाच्‍या वापरकर्ते सातत्‍याने स्‍क्रोल करत राहिल्‍याने त्‍यांना चिंता, नैराश्‍य आणि तणावाला सामोरे जावे लागते.

सोशल मीडिया अप्‍सवरील सक्रिय वापरकर्ते (स्‍वत:ही पोस्‍ट, रिल्‍स शेअर करतात आणि दुसर्‍यांनी केलेल्‍या पोस्‍ट आणि व्‍हिडिओ पाहतात ) यांच्‍या तुलनेत निष्‍क्रीय वापरकर्ते हे लवकर उदासपणा आणि एकाकीपणाचा त्रास अनुभवतात, असेही स्‍पष्‍ट झाले.

Social Media Apps : सक्रीय वापरकर्त्यांना धोका कमी

सोशल मीडिया ॲप्‍सवर अधिक सक्रिय वापरकर्ते स्‍वत:ही पोस्‍ट, रिल्‍स शेअर करतात आणि दुसर्‍यांनी केलेल्‍या पोस्‍ट आणि व्‍हिडिओ पाहतात ) त्‍यांना अभिप्राय मिळतात. सकारात्‍मक व पसंतीच्‍या कमेंटसमुळे त्‍यांच्‍या उत्‍साह वाढतो. त्‍याचा तणाव कमी करण्‍यासाठीही हा एक सकारात्‍मक परिणाम ठरतो, असेही या सशोधनात नमूद केले आहे.

वेळीच सावध व्‍हा…

नवीन संशोधनातील माहिती ही सोशल मीडियाच्‍या अतिवापरामुळे चिंता, नैराश्‍य आणि तणावाच्‍या लक्षणांशी संबंधित आहे. तसेच ती एकाकीपणा आणि मानसिक त्रास याचेही कारण असल्‍याचे स्‍पष्‍ट करत. त्‍यामुळे भविष्‍यात हे संशोधन दिशानिर्देश ठरेल, असा विश्‍वास या संशोधक कॉन्स्टंटिना पनोरगिया यांनी व्‍यक्‍त केले आहे.

सोशल मीडिया अप्‍स वापरकर्त्यांनी आपण सोशल मीडियामध्ये किती वेळ व्‍यस्‍त राहतो, याचा प्रथम विचार करणे गरजेचे आहे. आपण किती तास  सोशल मीडिया ॲप स्क्रोल करताे यामुळे  एकाकीपणा, नैराश्य आणि  तणाव निर्माण हाेताे याची जाणीव ठेवा, असा सल्‍लाही कॉन्स्टंटिना पनोरगिया यांनी साेशल मीडिया ॲप्‍सचा अतिवापर करणार्‍या वापरकर्त्यांना दिला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button