Child & Mobile Phones: पालकांनो! मुलांना मोबाईल द्या, मात्र त्यापूर्वी त्यांना मोबाईल ‘साक्षर’ करा | पुढारी

Child & Mobile Phones: पालकांनो! मुलांना मोबाईल द्या, मात्र त्यापूर्वी त्यांना मोबाईल 'साक्षर' करा

पुढारी ऑनलाईन डेस्क: लहानापासून वयोवृद्धांपर्यंत आज सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसतात. मुले पालकांना त्रास देऊ लागले की, त्‍यांना  शांत करण्यासाठी पालक मोबाईलचा आधार घेतात. पालकांनी मुलांना कोणत्या वयात मोबाईल फोन द्यावा?, त्याचा मुलांचे आरोग्य आणि मानसिकतेवर काय परिणाम होईल?, मुलांना मोबाईल फोन देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?, यावरील नवीन संशोधन करण्यात आले.  १० ते १३ वयोगटातील मुलांना मोबाईल फोन (Child & Mobile Phones) हाताळण्‍यास द्यावा, मात्र त्यापूर्वी त्‍यांना योग्‍य प्रशिक्षण द्यावे, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाईल फोनचा मुलांवर हाेणार्‍या मानसिक परिणामाविषयी ‘सेपियन लॅब्स’ने संशोधन केले आहे. यासंदर्भात जागतिक मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण आणि मेंटल हेल्थ कोटिएंट मूल्यांकनाचा वापर केला गेला. सोशल मीडियामुळे मुलांच्‍या स्‍वभावात होणारे बदल, सामाजिक जाण आणि मानसिक आरोग्यावर होणार्‍या परिणाम याचाही अभ्‍यास नवीन संशोधनात करण्‍यात आला. तसेच वय वर्षे १० ते १३ या वयोगटातील म्हणजे ५ वी ते ७ वी पर्यंतच्या मुलांना मोबाईल द्यावा, मात्र त्यापूर्वी त्यांना मोबाईल साक्षर (Child & Mobile Phones) जरूर करा अशी सूचना संशाेधकांनी केली आहे.   जाणून घेऊया पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल साक्षर कसे बनवावे याविषयी…

Child & Mobile Phones: पालकांनो…! ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

मोबाईल वापराच्या मर्यादा लक्षात घ्या

मुलांकडून हाेणार्‍या स्‍मार्ट फाेनच्‍या वापराबाबत मानसिक आरोग्यावर जनजागृती करणाऱ्या तसेच कोल्हापूरमध्ये मुलांसाठी विशेष मार्गदर्शन केंद्र चालवण्याऱ्या मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमाळे-काकडे यांनी सांगितले की,  पालकांनी मुलांना मोबाईल देताना WHO ने घालून दिलेले नियम लक्षात घेतले पाहिजेत. वयवर्षे एकपर्यंत नो स्क्रीन, ३ वर्षाच्या मुलांसाठी १ तासांपेक्षा जास्त वेळ पालकांनी मोबाईल देऊ नये. मुलांच्यातील मोबाईल वापराच्या मर्यादा पालकांनी लक्षात घ्याव्यात. मोबाईल हे एकमेव मनोरंजनाचे साधन आहे असे पालकांनी मुलांना भासवू नये, तसेच याची सवय देखील लावू नये. मनोरंजनासाठी इतरही काही साधने आहेत, त्याचा वापर केला पाहिजे, हे पालकांनी मुलांना पटवून दिले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांना रिवॉर्ड म्हणून मोबाईल (Child & Mobile Phones) वापरण्यास देऊ नये, याला पर्यायी दुसरी मनोरंजनाची साधने ही उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा.

मोबाईलकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे

तुमच्या मुलांना मोबाईल मधील अधिक माहिती असल्यास तुम्ही त्यांचे कौतुक करता, परंतु हे चुकीचे आहे. मोबाईल गरजेसाठी वापरली जाणारी वस्तू आहे. मोबाईलच्या अधिक वापरामुळे मुलांच्या दैनंदिन गोष्टींवर परिणाम होतो. त्यांची एकाग्रता, झोप, मानसिकता या सर्वावर दुष्परिणाम होतो. मोबाईल हे एकमेव मनोरंजनाचे साधन नाही, ही गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे. मोबाईलकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. मोबाईलच्या दुष्परिणामांवर मुलांसोबत पालकांनी संवाद साधला पाहिजे. याबाबत घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी देखील अवेर असणे गरजेचे आहे, असेही मानसोपचार तज्ज्ञ शाल्‍मली रानमाळे-काकडे यांनी सांगितले.

मोबाईल वापरताना मोबाईलमध्ये Google Child मोड सेट करावा

मुले काय पाहतात हे कित्येकवेळा पालक पाहत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देतेवेळी Google Child मोड सेट करून द्यावा.

मानसोपचारतज्ज्ञ शाल्मली रानमाळे-काकडे

हेही वाचा:

 

Back to top button