Global day of parents : पालकत्वाची जबाबदारी पेलताना 'या' चुका टाळा | पुढारी

Global day of parents : पालकत्वाची जबाबदारी पेलताना 'या' चुका टाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पालकांच्या त्यांच्या मुलांप्रती असलेल्या वचनबद्धतेची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी १ जून रोजी जागतिक पालक दिन ( Global day of parents  )साजरा केला जातो. पालक होणे ही खूप मोठी जबाबदारी असते. आधुनिक काळात मुलांशी योग्‍य संवाद साधणं ही प्रत्‍येक पालकांसमोरील आव्‍हान आहे. आज जागतिक पालक दिनानिमित्त पालकांनी मुलांशी संवाद साधताना प्रामुख्‍याने कोणत्‍या गोष्‍टींचा विचार करावा, या विषयी जाणून घेवूया…

Global day of parents  : पालकांचा संवाद ठरतो अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण

संयम हा शब्‍द पालकांसाठी महत्त्‍वाचा ठरतो. मुलांच्‍या चुकांवर पालकांनी तत्‍काळ रागवून प्रतिक्रिया देणे हे या नात्‍यातील दरी वाढण्‍याची भीती असते. कारण पालकांच्या रागवण्याने मुले स्वत:ला दोषी ठरवतात. या विचारामुळे मुलांवर ताण निर्माण होतो. याचा परिणाम मुलांच्या मेंदू विकासावर होतो. त्यामुळे मुलांना भविष्यात मानसिक आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो, त्‍यामुळे पालकांनी आपल्‍या मुलांशी संवाद साधताना परिस्‍थिती कशीही असली तरी संयम बाळगणे अत्‍यावश्‍यक ठरते।

पालक सतत रागवत असल्याने मुले अबोल बनतात. याचा परिणाम त्यांच्या भावनेवर होतो.पालकांच्या भितीने मुळे आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मनात दाबून ठेवतात, यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. एका संशोधनात म्हटले आहे की, बालपणात जर मुलांना शाब्दिक आणि शारीरिक ताणतणावाचा सामना करायला लागला तर,प्रौढवयात त्याला डोकेदुखी, संधिवाकत आणि तीव्र वेदनेचा सामना करावा लागू शकतो.

पालकांनी मुलांशी संचाद साधताना या सोप्‍या टीप्‍स फॉलो कराव्‍यात

पालक आणि मुलांमधील संवादाविषयी तज्ज्ञ सांगतात की, “पालकांनी घरात येताच बाह्यविश्‍वातील विचार, ऑफिसचे काम, जीवनातील ताणतणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांसोबत फ्रेश मुडने संवाद साधण्‍यावर भर द्‍यावा. यामुळे त्‍यांच्‍याही मनावरील ताण कमी होण्‍यास मदत होते.

मुलांसोबत संवाद साधताना आपला राग, चिडचिड, विचार बाजूला ठेवणे आवश्यक आहे. मुलांचे वर्तन चुकले तरी त्‍याला समजून घेण्‍यास प्राधान्‍य द्‍या. संवाद साधताना त्यांच्या वयाच्या पातळीला जावून संवाद साधा, म्हणजे ते लवकर संवादी बनतील.पालकांचा आणि मुलांचे नाते संवादी झाल्यास मुलांच्या सर्वागीण जडणघडणीवरदेखील याचा सकारात्मक परिणाम होतो.

हेही वाचा : 

 

Back to top button