Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय! | पुढारी

Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!

स्‍वालिया शिकलगार  : तोंडवली, तारकर्ली, देवगड फिरल्यानंतर नव्या ठिकाणी जाण्याचे वेध लागतात. वर्षातून एक तरी ट्रीप याठिकाणी असते. पण, सारखं सारखं त्याच त्याच ठिकाणी जायचं म्हटलं की जाम कंटाळा येतो. पण, नेहमी ‘कोकणच बरा असा’ असंही वाटतंय. सोशल मीडियावर ते फिरणारं वाक्य ‘येवा कोकण आपलोचं असा’ सारखं सारखं डोळ्यांसमोर येतं. (Unexplored Konkan ) मग, काय पुन्हा गाडी त्याचं दिशेला वळते. जी पर्यटनस्थळे आपल्याला माहिती नाहीत किंवा जिथे फार कमी लोक जातात, अशा ठिकाणांचा शोध सुरु होतो. हा शोध वालावल, नेरुर अन् निवती या ठिकाणी येऊन थांबतो. समोर येतात ही काही सुंदर, अप्रतिम ठिकाणं, जिथे तुम्ही बिनधास्त फिरू शकता. Unexplored Konkan शोधत शोधत वालावल, नेरुर अन् निवतीचे बीच येऊन डोळ्यांसमोर उभे राहते. (Unexplored Konkan )

वालावल चेंदवण

वालावल-

दक्षिण कोकणात जांभा दगडांमध्ये वसलेलं वालावल गाव. कुडाळ तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल हे निसर्गाने नटलेलं गाव. रुपेरी वाळू, चमचमणारा प्रकाश आणि खळखळत्या समुद्रावर डोकावून पाहणारा सूर्य पाहणे म्हणजे ‘व्वा क्या बात है!’ बीचवर वाहणारा झुळझुळ वारा, सूर्यास्त होतानाचा होणारा आनंद गगनात मावेनासा होतो. थोडी संध्याकाळ झाली की, वाळूंमध्ये दोन्ही पाय रुतून खळखळणाऱ्या समुद्राकडे शांत पाहत राहावं बस्स इतकाचं काय तो लाभणारं स्वर्गाहून अधिक सुख! हे वाचून डोळ्यांसमोर उभारला ना निसर्ग? असाच निसर्ग वालावल, निवती आणि नेरुरमध्ये भेटणार. वालावलसारखं सुंदर ठिकाण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. दडलेल्या कोकणाची खरी अनुभूती वालावलमध्ये गेल्यानंतरचं येते. वालावल तसे शांत असणारं ठिकाण, जे नेहमीच पर्यटकांना खुणावणारं आहे. वालावलला ‘कोकणातील स्वर्ग’ असंही म्हटलं जातं.

वालावल हे दाट जंगलांनी झाकोळलेलं गाव आहे. बाजूला कर्ली नदी वाहते. डोंगर-दऱ्यांमुळे या गावच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय. याठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ज्याला प्राचीन इतिहास आहे. मंदिराची बांधणी चालुक्यकालीन असल्याचे म्हटले जाते. तसेच काही अंतरावर श्री रवळनाथाचे मंदिर आहे. शेजारीच खंदरबी देवी ही माहेरवाशिनींची देवी म्हणून ओळखली जाते.

वालावल रोड

काय काय पहाल – सती मंदिर, कर्ली नदीच्या काठावर वसलेले हे अत्यंत रमणीय असे गाव आहे. कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे गाव प्रसिद्ध आहे.

कसे जाल – सावंतवाडीपासून ३५ किमी. अंतरावर हे गाव आहे.

वालावलच्या जवळची ठिकाणे-

म्हापन, नाईकवाडी, वडगाव, तळेगाव, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली, नाईकवाडी, काविलगाव, तळेगाव, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली, चेंदवण, कवठी, गांधीग्राम, नाईकनगर, मुद्याचा कोंड, गाव धज इत्यादी.

म्हापन गावातील मंदिर

कर्ली नदी –

वालावलचे दर्शन घेऊन कर्ली नदीत बोटींगची मजा घेणे कुछ और बात है. या गावात मासेमारीचा आनंद ही तुम्ही घेऊ शकता. बोटींग करताना पाण्यात वाकून पाहणारी माडाची झाड, सभोवताली केवडा, नारळ, सुपारीच्या बागा,ही खरी कोकणातील सहलीचा येणारा अनुभव आयुष्यभर विसरता येणार नाही.

ब्रह्मनाथ मंदिर, नेरुर

नेरुर गाव –

भाताची शेती, कोकणी पद्धतीची भाताची शेती, तळ्यात पोहणारी बदके आणि फुललेली कमळे असं एक सुंदर तळे याठिकाणी आहे. याठिकाणी एक सुंदर देवालय आहे. दीपमाळा, तळं आणि प्रसन्न करणारं वातारवरण असे नेरुरचं वर्णन करता येईल. श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर , महादेवाचं मंदिर येथील कमालीची शांतता आत्मिक समाधान देते. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कलेश्वर देवस्थान हे नेरूर गावची ग्रामदेवता होय.

निवती बीच

निवती बंदर –

फारसा लोकप्रिय नसलेलं बंदर आहे. येथे मासेमारीसाठी समुद्रकिनारा आहे. खूप साऱ्या रंगबेरंगी बोटी या समुद्रात पाहायला मिळतात. येथे रोज माशांचा लिलावही भरतो. निवती बंदरावर कौलारू घरे आहेत, जी नारळाच्या झाडांमध्ये लपलेली दिसतात.

निवती सनसेट पॉईंट

इथे रम्य संध्याकाळ एकांतात घालवणं म्हणजे स्वर्गाहून अधिक सुख आहे. समुद्रामध्ये असणारे सोन्यासारखे चमकणारे गोल्डन रॉक पाहण्यासाठी तुम्हाला बोटीची सफर करता येते. येथूनचं जवळच असलेल्या निवती सनसेट पॉईंटलादेखील तुम्ही भेट देऊ शकता.

भोगवे बीच

भोगवे बीच-

भोगवे हे वेंगुर्ले तालुक्यातील गाव आहे. स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनारा या गावाला लाभलेला आहे. भोगवे गावात कर्ली नदी आणि समुद्राचा संगम पाहायला मिळतो. पांढरी वाळू हे या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य. नारळी – पोफळीच्या बागांमध्ये उटून दिसणारा समुद्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. येथे निवती किल्लादेखील पाहायला मिळतो. कोचरे गावच्या हद्दीत निवतीचा किल्ला आहे.

भोगवे बीच

‘डॉल्फिन’ मासे पाहण्यासाठी या बीचवर गर्दी होत राहते. डॉल्फिनच्या झुंडी पाहण्यासाठी तुम्हाला बोटींमधून समुद्र सफर करता येते. येथे राहण्यासाठी बीच रिसॉर्टदेखील आहे.

कसे जाल – कुडाळ-वालावल-परूळे मार्गे भोगवे.

जवळची ठिकाणे – निवती बीच १३ किमी आहे. कोंडुरा बीच देखील तुम्हाला पाहता येईल.

नेरूर महादेव मंदिर
नेरूर महादेव मंदिर

कोंडूरा बीच –

हे एक लहान बीच आहे. पांढरी चमकदार वाळू हे या बीचचं वैशिष्ट्य. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील किनारे खूप स्वच्छ आणि नितळ आहेत. शंख-शिपले, गुळगुळीत दगडे या किनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.

कलावी बीच

कलावी बीच – तसे हे शांततेचं ठिकाण आहे.

केळूस बीच

केळूस बीच –

केळूस हे गाव छोटे असून येथे तुरळक लोकसंध्या आढळते. येथे जाण्यासाठी एसटी बस किंवा कारने जाऊ शकता. येथे एक छोटं बीच असून याठिकाणी जाणे स्मरणीय ठरणारे आहे. सिंधुदुर्गापासून ३५ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे.

या छोट्या-छोट्या ट्रीपवर जाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उत्तम प्लॅन बनवू शकता. येथे फोटोशूट, कॅम्प फायर आणि टेंट कॅम्प लावूनदेखील रम्य संध्याकाळ घालवू शकता. आसपास हरिचरणगिरी, वायंगणी दाभोळी बीच, वेंगुर्ला, श्रीरामवाडी या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

हरिचरण बीच

हेदेखील वाचा-

खावणे बीच
खावणे बीच
वायंगणी दाभोळी बीच

Back to top button