Solar Eclipse 2022 : खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त); जाणून घ्या ग्रहण वेध पाळण्याचा काळ | पुढारी

Solar Eclipse 2022 : खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त); जाणून घ्या ग्रहण वेध पाळण्याचा काळ

पुढारी ऑनलाईन : मंगळवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा. (Solar Eclipse 2022)

ग्रहणाचा वेध (Solar Eclipse 2022)

हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे 3.30 पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी 12.30 पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. या वेळेत भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील. पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईकरिता दुपारी 4.49 ते सायंकाळी 6.08) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.

परंपरेप्रमाणे करा लक्ष्मीपूजन

या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटेपासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही. तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजनदेखील परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील. (Solar Eclipse 2022)

१९९५ साली दिवाळीमध्ये आले होते सूर्यग्रहण

यापूर्वी 1995 मध्ये याच प्रमाणे दि. 23 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होते, 24 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज आलेली होती. या नंतर 3 नोव्हेंबर 2032 मध्ये याच प्रमाणे दिवाळीमध्ये ग्रहण येणार आहे; मात्र हे ग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही तर उत्तर भारतामध्ये दिसेल.

– दाते पंचांगकर्ते


अधिक वाचा :

Back to top button