दिवाळीत यंदा खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार, जाणून घ्या ग्रहण प्रारंभाची वेळ | पुढारी

दिवाळीत यंदा खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार, जाणून घ्या ग्रहण प्रारंभाची वेळ

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : यावर्षी दिवाळीत मंगळवार, 25 अ‍ॅाक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची पर्वणी अनुभवता येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, आश्विन अमावस्या, मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र (सॅरोस) 124 क्रमांकाचे आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात हे सुंदर द़ृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6.08 वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किनार्‍यावरून पाहिल्यास सागरात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. या सूर्यग्रहणानंतर 14 दिवसांनी मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे.

ग्रहण पाहताना अशी घ्या काळजी

असे सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास द़ृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण ग्रहण चष्म्यातूनच पाहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पाहावे.

ठिकाण                 ग्रहण प्रारंभ       सूर्यास्त

पुणे                      सायं. 4-51          सायं. 6-31
नाशिक                सायं. 4-47           सायं. 6-31
नागपूर                 सायं. 4-49           सायं. 6-29
कोल्हापूर             सायं. 4-57           सायं. 6-30
संभाजीनगर          सायं. 4-49           सायं.6-30
सोलापूर               सायं. 4-56           सायं. 6-30

Back to top button