Pregnancy and Anxiety : गर्भावस्थेतील ‘चिंता’ ठरते धोकादायक, अकाली प्रसूतीचा धोका – नवीन संशाेधनातील निष्‍कर्ष | पुढारी

Pregnancy and Anxiety : गर्भावस्थेतील 'चिंता' ठरते धोकादायक, अकाली प्रसूतीचा धोका - नवीन संशाेधनातील निष्‍कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गर्भावस्‍था धारण केल्‍यापासून आई होण्‍यापर्यंतचा काळा महिलांसाठी आव्‍हानात्‍मक असतो. या काळात शारीरिक काळजी घेतली जाते;पण या काळात महिलांनी आपली मानसिकस्‍थिती चांगली ठेवणे खूपच आवश्‍यक ठरते. कारण   गर्भावस्‍थेत चिंताग्रस्‍त असणार्‍या महिलांची अकाली प्रसूती होण्‍याचा ( प्रीमॅच्युअर डिलीवरी ) धोका असतो, असा निष्‍कर्ष लॉस एंजेलिस विद्यापीठातील नव्‍या संशोधनात मांडण्‍यात आला आहे. ( Pregnancy and Anxiety )

हेल्थ सायकॉलॉजी या जर्नलमध्ये नुकतेच यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झालं आहे. यामध्‍ये लॉस एंजेलिस विद्यापीठातील प्रमुख अभ्यास लेखक क्रिस्टीन डंकेल शेटर म्‍हटलं आहे की, “गर्भधारणेनंतर महिलेच्‍या चिंताग्रस्‍त राहण्‍याचा थेट प्रसूतीवर परिणाम होतो. त्‍यामुळेच आज गर्भवतीची मानसिक अवस्‍थेतेचेही मूल्‍यांकन होणे आवश्‍यक आहे.

चारपैकी एका गर्भवतीमध्‍ये चिंतेची लक्षणे दिसून आली. अशा महिलांमध्‍ये अकाली प्रसूतीचे प्रमाण सर्वाधिक होते. नुकत्‍याच झालेल्‍या संशोधनात संशोधकांनी लॉस एंजेलिसमधील १९६ गर्भवती महिलांच्‍या विविविध नुमन्‍यातील माहितीची पाहणी केली. यामध्‍ये निरोगी बाळाला जन्‍म देणार्‍या गर्भवतींची पाहणी केली गेली. यामध्‍ये असे निदर्शनास आलं की, गर्भधारणेच्‍या पहिल्‍या आणि तिसर्‍या महिन्‍यात महिलांची मानसिक अवस्‍थेचे मूल्‍यमापन करण्‍यात आले. गर्भवतींवर असणार्‍या चिंता आणि ताणतणावांची माहिती घेण्‍यासाठी प्रश्‍नावली तयार करण्‍यात आली.

संशोधनात स्‍पष्‍ट झाले की, गर्भधारणा संबंधिती चिंता तसेच पहिल्‍या तीन महिन्‍यात ज्‍या महिला चिंताग्रस्‍त होत्‍या त्‍यांची अकाली प्रसूती होण्‍याचा धोका अधिक होता. त्‍यामुळे आमचे संशोधन सांगते की, महिलेला गर्भधारणा झाल्‍यानंतर तिचे मानसिक आरोग्‍याचीही तपासणी होणे आवश्‍यक आहे, असेही क्रिस्टीन शेटर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button