तुम्ही ‘हेलिकॉप्टर’ पालक आहात का? जाणून घ्या ‘हे’ तोटे
पुढारी ऑनलाईन – समजा तुमची मुलगी तिच्या मैत्रिणीशी भांडून घरी तक्रार घेऊन आली तर तुम्ही काय करता? लगेच त्या मैत्रिणीच्या आईला फोन करून स्वतःच भांडत बसता किंवा मुलीला सांगता की तू मैत्रिणी बोल आणि जे काही भांडण असेल ते मिटवून टाक. जर तुम्ही पहिल्या प्रकारातील पालक असाल तर तुम्ही 'हेलिकॉप्टर पालक' आहात आणि तुमच्या पालकत्वाच्या सवयीत तुम्हाला तत्काळ बदल करण्याची गरज आहे. (helicopter parents do they help or hurt kids?)
अतिकाळजी करणारे, मुलांच्या संरक्षणाबद्दल जास्तच सजग असणारे आणि मुलांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ढवळाढवळ करणारे पालक म्हणजे 'हेलिकॉप्टर' पालक. हेलिकॉप्टर जसे घिरट्या घालत असते तसे तुम्ही मुलाच्या डोक्यावर नेहमी घिरट्या घालत असता.
अशा प्रकारच्या पालकत्वाचे काही फायदे असले तरी तोटेच जास्त असतात, असे Verywell Family या वेबसाईटने म्हटले आहे. असे पालक मुलांच्या ॲक्टिव्हिटी, मुलांची शाळा, होमवर्क यामध्ये फार जास्त गुंतलेले असतात. मुलांना त्रास होऊ नये, त्यांचे मन मोडू नये यासाठी मुलांना यशस्वी होण्यासाठी असे पालक सतत प्रयत्नशील असतात. एक प्रकारे ते मुलांना मायक्रोमॅनेज करत असतात.'
असे पालक मुलांची फार जास्त काळजी करतात. मुलांसाठी सारे काही सोपे आणि सुटसुटीत व्हावे, यासाठी पालक धडपडत असतात,' असे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मिशेल रेनॉल्डस यांनी म्हटले आहे.
हेलिकॉप्टर पालक हा शब्द सर्वप्रथम १९६९ला वापरला गेला. Between Parent & Teenager या पुस्तकात एक मुलाने 'आई हेलिकॉप्टरसारखी लक्ष ठेऊन असते,' असा उल्लेख या पुस्तकात आला आहे. तेथूनच हेलिकॉप्टर पालक हा शब्द वापरला जाऊ लागला.
मुलांना सुरक्षित ठेवावे, मुलांनी यश मिळवावे ही नैसर्गिक भावना यामागे असते. आपण लहानपणी जे सहन केले आहे, ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, ही भावनाही यामागे असते; पण अशा प्रकारच्या पालकत्वाचे काही तोटे ही असतात, ते पुढील प्रमाणे आहेत.
१. अशा प्रकारच्या पालकत्वामुळे मुलांत समस्यांना तोंड देण्याची क्षमता कमी होते. स्वतःच्या समस्या कशा सोडवाव्यात, यासाठी मुलांचे कौशल्य विकसित होत नाही.
२. पालकांवरील अवलंबित्व वाढते – अशा प्रकारच्या पालकत्वामुळे मुलांचे सर्वच बाबतीत पालकांवरील अवलंबित्व वाढते. स्वतःच्या जबादाऱ्या स्वतः कशा पार पाडाव्यात हे अशा मुलांना समजू शकत नाही.
३. कमी आत्मविश्वास – सगळ्याच जबाबदाऱ्या पालक पार पाडत असल्याने मुलांत आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. शाळेत प्रश्न विचारणे, शंका विचारणे या गोष्टी मुलांना कठीण वाटतात.
४. आत्मविश्वासाचा अभाव – पालक सतत डोक्यावर घिरट्या घालत असल्याने आपण एखादी गोष्ट स्वतः करू शकतो हा आत्मविश्वास या मुलांत नसतो. अशा मुलांत पौगंडावस्थेत आणि तरुण वयात आत्मविश्वास नसल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
५. परिस्थितीशी मात कशी करावी याबद्दल अशी मुलं गोंधळलेली असतात. आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागणार आहे, आणि अशा संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य अशा मुलांत विकसित झालेले नसते.
६. पालक आणि मुलांचे नाते बिघडते – हेलिकॉप्टर पालक जे करतात ते प्रेमापोटी करतात; पण सतत कुणी तरी डोक्यावर बसलं आहे, आपल्यासाठीचे सर्व निर्णय पालकच घेतात, आपल्या प्रत्येक हालचालींवर कुणी तरी लक्ष ठेवून आहे याचा नकारात्मक परिणाम पालक आणि मुलांतील नात्यांवर होतो.
हेही वाचा

