Parents Mistakes : पालकांच्‍या चुकांचा मुलांवर होतो नकारात्‍मक परिणाम… जाणून घ्‍या काय आहेत ‘या’ चुका | पुढारी

Parents Mistakes : पालकांच्‍या चुकांचा मुलांवर होतो नकारात्‍मक परिणाम... जाणून घ्‍या काय आहेत 'या' चुका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजच्‍या धावपळीच्‍या जीवनात मुलांचे योग्‍य संगोपन हा महत्त्‍वाचा विषय आहे. एकीकडे अपत्‍य संख्‍या मर्यादीत झाली आहे.  पालकांच्‍या मुलांकडून अपेक्षा वाढल्‍या आहेत. यातूनच मग मुलांना वाढवताना भारतीय पालकांकडून नकळत काही चुका होतात. ( Parents Mistakes ) या चुका मुलांच्‍या भविष्‍यासाठी मारक ठरतात. त्‍यांचा आत्‍मविश्‍वास कमी करतात. लेखक आणि शिक्षक अंकुर वारीकू यांनी भारतीय पालकांकडून होणार्‍या प्रमुख चुका कोणत्‍या यावर बोट ठेवले आहे. जाणून घेवूया, पालकांनी कोणत्‍या चुका टाळाव्‍यात याविषयी…

Parents Mistakes : सतत तुलना करणे

Parents Mistakes

तुलना हा शब्‍द स्‍पर्धा निर्माण करतो. वास्‍तविक याचा सकारात्‍मक विचार केला तर मुलांच्‍या पोषक वाढीसाठी स्‍पर्धा आवश्‍यकच असते;पण काही पालकांना आपल्‍या मुलांची इतर मुलांशी तुलना करण्‍याची सवय असते. सातत्‍याने केलेल्‍या तुलनेमुळे मुलांमधील आत्‍मविश्‍वास कमी होतो. तसेच त्‍यांच्‍या उपजत गुणांनाही खीळ बसण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे सातत्‍याने आपल्‍या मुलाची इतरांशी तुलना करणे पालकांनी टाळावे.

मुलांच्‍या मनातील जिज्ञासा आणि कुतूहल संपवू नका

मुलांना प्रत्‍येक गोष्‍टीची जिज्ञासा असते. त्‍याच्‍यासाठी शिकण्‍यातील प्रत्‍येक अनुभव हा नवा असताे. यातूनच ते सतत विविध विषयांवर प्रश्‍न विचारत असतात. अशावेळी पालकांनी न कंटाळता त्‍याला सकारात्‍मक प्रतिसाद देणे, त्‍याच्‍या शंकांचे निरसण हाेईल, अशी उत्तर देणे आवश्‍यक असते. मात्र अलिकडे पालकच एवढे धावपळीत असतात की, त्‍यांचे मुलांच्‍या कुतूहलाकडे दुर्लक्ष हाेते. पालक मुलांकडून केवळ शालेय प्रश्‍नांच्‍या उत्तरातून चांगल्‍या गुणांची अपेक्षा करतात. हे त्‍याच्‍यातील जिज्ञासेला मारक ठरते.  पालकांनी मुलांच्‍या मनातील जिज्ञासा आणि कुतूहलास चालना द्‍यावी. त्‍यांनी मुलांच्‍या प्रश्‍नांना उत्तरे दिली नाही तर त्‍यांचे जगण्‍यविषयाचे जिज्ञासा आणि कुतूहलच संपून जाईल, जे भविष्‍यात त्‍यांच्‍या वाढीसाठी फारच हानीकारक ठरेल.

लोक काय म्‍हणतील? याचा विचार करु नका

समाज हा महत्त्‍वाचा असतोच. मात्र समाजात काय चालले आहे. याचा विचार करुन मुलांचे संगोपन करणे चुकीचे आहे. कारण जर समाजाकडे पाहून निर्णय घेतले तर तुम्‍ही इतरांचे अनुकरण करुन आपल्‍या मुलांबाबत निर्णय घेता. त्‍याऐवजी मुलांना काय योग्‍य वाटते याचा विचार करा. लोक काय म्‍हणतील या विचारातून बाहेर पडा. तुम्‍ही मुलांच्‍या सकारात्‍मक मतांचा आदर केल्‍यास मुलांमधील आत्‍मविश्‍वास वाढण्‍यास मदत हाेते.

Parents Mistakes : स्‍वत:चे अनुभव मुलांवर लादू नका

नेहमी लक्षात ठेवा की, प्रत्‍येक पिढीसमोरील आव्‍हाने वेगळी असतात. तुम्‍ही लहान होता तेव्‍हा परिस्‍थिती वेगळी होती. त्‍यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या पालकांनी काय दिले ही खूपच वेगळी गोष्‍ट ठरते. कारण जग सातत्‍याने बदलत असते. याचा विचार करुन मुलांना स्‍वातंत्र्य द्या स्‍वत:चे अनुभव मुलांवर लादू नका. मुलांमधील आत्‍मविश्‍वास वाढण्‍यासाठी त्‍यांना जगाकडे पाहण्‍याचा स्‍वत:चा असा दृष्‍टीकोन तयार करण्‍यासाठी मदत करा.

Parents Mistakes : इमोशनल ब्‍लॅकमेलिंग थांबवा

Parents Mistakes

पालक अनेकवेळा आपली मते मुलांवर लादतात. तसेच हतबल झाल्‍यावर तुम्‍हाला जे करायचे आहे ते करु शकता, असे म्‍हणत भावनिक ब्‍लॅकमेलिंगही करतात. मात्र अशामुळे मुलांमध्‍ये भीती आणि आळशीपणा वाढेल. ते स्‍वत: निर्णय घेण्‍याची प्रक्रियाच शिकू शकणार नाहीत. त्‍यामुळे मुलांना निर्णय घेण्‍यापासून थांबवू नका.इमोशनल ब्‍लॅकमेलिंग करुन आपली मते मुलांवर लादू नका

मानसिक आरोग्‍याकडे दुर्लक्ष नकाे

आधुनिक जगता शारीरिक आरोग्‍याबरोबर मानसिक आरोग्‍य संतुलित ठेवणे हे मोठे आव्‍हान आहे. मागील काही वर्षांपूर्वी मानसिक आरोग्‍याचा विचार केला जात नव्‍हता. त्‍यामुळे मानसिक आराेग्‍य हे एक फॅड आणि त्‍याची लाज वाटण्‍यासारखे काहीच नाही. त्‍यामुळे पालकांनी मुलांचे मानसिक आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. याकडे दुर्लक्ष करु नका. कारण मानसिक आरोग्‍यावर मुलांच्‍या भावी जीवनाची वाटचाल ठरत असते.

मुलांवर अविश्‍वास दाखवू नका

Parents Mistakes

कोणत्‍याही नात्‍याचा पाया हा विश्‍वास आहे. पालक आणि पाल्‍यांमधील नात विश्‍वास हा महत्त्‍वाचा ठरतो. त्‍यामुळे पालकांनी मुलांवर विश्‍वास दाखवणे हे फार महत्त्‍वाचे आहे. यामुळे त्‍यांच्‍या आत्‍मविश्‍वास वाढण्‍यास मदत होते. पालकांनीच मुलांवर अविश्‍वास दाखवला तर याचा नकारात्‍मक परिणाम त्‍याच्‍या मानसिकतेवर होतो.

मुलांना काहीच समजत नाही असा अर्विभाव ठेवू नका

मुलांचे कळते वय झाले तरी त्‍याला काहीच समज नाही, असे अर्विभाव ठेवू नका. पैसा ही जीवन जगतानाची एक अत्‍यंत महत्त्‍वाची गोष्‍ट आहे. आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्‍वही मुलांना समजवून सांगायला हवे. त्‍यांना काहीच कळत नाही, असे सांगून त्‍यांना आर्थिक व्‍यवहाराबाबत अंधारात ठेवू नका.

मुलांकडून अवास्‍तव अपेक्षा ठेवू नका

परीक्षा आणि यश हे एक अलिकडे समीकरण बनले आहे. मात्र मुलांना काय आवडते याचा प्रथम विचार करा. तसेच तुमची स्‍वप्‍ने मुलांवर लादू नका. त्‍यांच्‍याकडून अवास्‍तव अपेक्षा ठेवू नका. लादलेली कोणतेही गोष्‍टीला मुले नकार देतात किंवा नाईलाजास्‍तव ती गोष्‍ट करतात. या दोन्‍ही गोष्‍टींचा त्‍यांच्‍या मनावर परिणाम होतो याची पालकांनी नेहमी जाणीव ठेवावी.

पालक जसे वागतात त्‍याच पद्‍धतीने मुलेही वागत असतात, याचा प्रथम विचार करा. पालकांनी सकारात्‍मक विचार केल्‍यास मुलांच्‍या अंतर्गत गुणांमध्‍ये वाढ होते. पालकांनी आपल्‍या हातून नकळत होणार्‍या चुका टाळल्‍या तर निश्‍चितच मुलांच्‍या वाढीवर याचा चांगला परिणाम होईल.

हेही वाचा : 

 

Back to top button