द काश्मीर फाईल्सचं टेक होम काय? | पुढारी

द काश्मीर फाईल्सचं टेक होम काय?

सुनील माळी 

काश्मिरी पंडितांवरच्या अत्याचाराची, त्यांच्या निर्घृण कत्तलीची, देवभूमीतून झालेल्या त्यांच्या हकालपट्टीची चीड येणं योग्यच होतं. पंडितांना न वाचवणाऱ्या भ्याड सरकारबद्दल-मिठाची गुळणी धरून बसलेल्या देशभरातील विचारवंतांबद्दल राग येणं स्वाभाविकच होतं.

पण या सिनेमाच्या ‘फस्ट डे फस्ट शो’पासून जी भीती वाटत होती ती आता खरी ठरतीये. भीती वाटत होती पाकिस्ताननं चिथावलेल्या अतिरेक्यांबद्दलचा आणि त्यांना सामील झालेल्या मूठभर काश्मिरी मुस्लिमांबद्दलचा न्याय्य राग संपूर्ण मुस्लिम समाजावर काढला जाण्याची. भीती वाटत होती ती संपूर्ण देशाच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाच्या ठोस उत्तरावर काहीही विचार न होता केवळ येणाऱ्या निवडणुकांत तत्कालिन फायदा उपटण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होईल, याची… झालंही तसंच. आता तर त्याचा कळस गाठला गेलाय.

या खंडप्राय देशातल्या शहरा-शहरात, गावा-गावात एकमेकांना धरून गुण्यागोविंदानं राहणाऱ्या अन एकमेकांशी नानाविध व्यवहारांनी-सांस्कृतिक बंधानं बांधल्या गेलेल्या भारतीय मुस्लिमांकडून चिकनपासून ते बेकरीपर्यंतच्या वस्तूंची खरेदी करण्यावरही बहिष्कार घालण्याच्या जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या विषारी मेसेजेसमुळं.

योग्य वेळ साधून हे सारं घडवलं गेलंय का? या सिनेमाच्या निर्मितीच्या उच्च मूल्यांविषयी, निर्माता-दिग्दर्शकाच्या हेतूविषयी किंवा अगदी त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी तूर्ततरी शंका घेऊ नये, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा आपल्याला राजकीय लाभ कसा उठवता येईल, दोन समाजांमध्ये दुही निर्माण करून आपल्याच पोळीवर तूप कसं ओतता येईल, याची नियोजनबद्ध आखणी केली गेली असावी, अशी शंका येऊ लागते.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या मुलाखती लागलीच चॅनेल्सवर झळकू लागल्या. त्यातही हिंदुत्व हा प्रचाराचा मुद्दा नसलेल्या राजकीय-साहित्यिक-सामाजिक नेतृत्वाबद्दलच्या विखाराच्या मतांना अधिक ठसठशीतपणे मांडण्यात येऊ लागलं. समाजमन बदलण्यासाठी, त्याला एका विशिष्ट विचारांकडे नेण्यासाठी विशिष्ट मेसेजेस-विनोद-लेख-मिम्स आदींचा पद्धतशीर मारा करण्यासाठी मोठी टीम देशपातळीवर तयार करण्यात आल्याचं आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट होत आलं आहे.

व्हॉट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियावर काश्मीर फाईल्सबद्दल ज्या पद्धतशीरपणे, मुद्देसूद नानाविध पोस्ट्स पसरू लागल्या आहेत, त्यावरून त्यामागे अशाच टीमचं नियोजन असावं, अशी शंका येऊ लागली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर २०१४ च्या निवडणुकीत सर्वप्रथम करण्यात आला तेव्हा त्याला उत्तर देण्याची जबाबदारी असलेले घटक सोशल मीडियाबाबत पूर्णपणानं अनभिज्ञ होते, मात्र हळूहळू ते सावरत गेले आणि आता मात्र त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा प्रतिवादही तितक्याच अभ्यासपूर्णरित्या करायला सुरूवात झाल्याचं दिसतं.

काश्मीरसारखा संपूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला प्रश्न सोडविला जावा, याबाबत कुणाचंच दुमत असणार नाही, पण या प्रश्नाच्या आडून धर्मवाद पेटविण्याचा प्रयत्न होताना दिसतो आणि तो दुर्दैवी आहे. काश्मीर खोऱ्यातली सर्व जनता अतिरेकी किंवा फुटिरतावादी विचाराची नाही, हे वास्तव काश्मीरात काही दिवस घालवलेला कुणीही अकाश्मिरी (आणि विशेषत: जन्मानं हिंदु) सांगू शकेल. तिथल्या जनतेला हवी आहे शांतता, हवा आहे स्नेह, हवा आहे रोजगार, हवी आहे समृद्धी, हवं आहे त्यांच्या कच्च्याबच्च्यांचं उज्ज्वल भवितव्य. हवे आहेत त्यासाठी त्यांच्यात मिसळून जाण्याची, त्यांना विश्वास देण्याची, पर्यटनापासून ते हस्तकलेसारख्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांद्वारे मिळणारा रोजगार वाढवण्याचे प्रयत्न. दुर्दैवानं देशातल्या सर्वच राजकीय शक्ती यांबाबत कमी पडल्या आहेत.

सर्वच राजकीय पक्षांना काश्मीर प्रश्न सोडवण्याची बिलकुल इच्छा नाही. हा प्रश्न जितका काळ चिघळत राहील, तितका काळ त्यांचं राजकीय अस्तित्व म्हणजे साध्या भाषेत पक्षांची दुकानं चालू राहतील. त्यामुळे या सर्वपक्षीय शक्तींनी हिंदु-मुस्लिम दुही कायम राखण्याचा यथाशक्ती प्रयत्न आजवर केलेला आहे. यामुळे राजकीय पक्षांवर काश्मिरींचा राग आहे. काही व्यक्तींचे अपवाद वगळता केंद्रस्थानी असलेल्या पक्षांच्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं काश्मिरीयत समजावूनच घेतलेली नसल्यानं केंद्राबद्दलही त्यांना आदर नाही. ही चीड कधी बोलून तर कधी लष्कराशी असहकार्य करून त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे.

काश्मीर खोरे म्हणजे ‘अतिरेकी मुस्लिमांचे चौकाचौकात बसलेले अड्डे’ अशी देशाच्या इतर भागांतील नागरिकांची खुळचट कल्पना करवून देण्यात आली आहे. त्यामुळं राजधानी श्रीनगरच्या नितांतसुंदर दल लेकमधील शिकाऱ्यात आपण झोपलेलो असताना पहाटे शेजारी असलेल्या शंकराचार्य टेकडीवरून लाऊड स्पीकरवरून संस्कृत मंत्रांचे पठण ऐकू येते, या वैदिक प्रार्थनांनी श्रीनगरला जाग येते, याची साधी माहितीही काश्मिरात कधीही न गेलेल्यांना नसते.

दिवसभर सोनमर्ग-गुलमर्ग-पेहलगाममधील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत फिरत असताना पर्यटकांनी काश्मीर मानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना राजकीय शक्तींबाबत राग का आहे, लष्कराला सहकार्य का केले गेले नाही, ते उलगडत जाईल. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील प्रशिक्षण छावण्यांतून चुकीचे शिक्षण घेऊन आलेल्या अतिरेक्यांकडून काश्मीरमधील काही तरूणांना बहकवले जाते, पण त्यामुळे बदनाम सरसकट सर्वसामान्य काश्मिरी तरूणांना केलं जातं, ते लक्षात येऊ लागेल.

लढाई पाकिस्तानशी अन आता चीनशीही आहे, लढाई तिथून येणाऱ्या अतिरेक्यांशी आहे अन गरज काश्मिरींना विश्वासात घेण्याची आहे, गरज मेन लँड नावानं तिथं ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण भारतमातेच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या भारतीयांनी काश्मिरींशी सांस्कृतिक बंध बांधण्याची आहे. यासाठी संजय नहारांसारखे महाराष्ट्रीय तरूण किंवा श्रीनगरमध्ये राहून समाजबांधणीचे काम करणारे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित वांछू यांच्यासारखे कार्यकर्ते जरूर काम करताहेत, पण ही संख्या वाढण्याची आ‌वश्यकता आहे.

अधिकाधिक काश्मिरी तरूणांच्या भारत दर्शनाची गरज आहे. ते सोडून आयुष्यभर ज्याच्याशी तुमचे-माझे ऋणानुबंध आहेत, पाकिस्तानी अतिरेक्यांशी काडीचाही ज्यांचा संबंध नाही, जे गणपती उत्सवाच्या मिरवणुकीत आपल्याबरोबर गुलाल खेळतात एवढंच नव्हे तर सांस्कृतिक-व्यावसायिक बंधाने आपल्याशी घट्ट बांधल्या गेलेल्या अशा शाबीर-उस्मान-रशीद-अमिनुद्दीन-बिलाल-अयाज अशा आपल्या घट्ट मित्रांशीही फारकत घेण्याचा विषारी प्रचार होतो आहे. कुठेतरी चुकतंय.

या समाज दुभंगण्याच्या हेतूने लिहिलेल्या मेसेजेसमधली काही वाक्यं वाचा. ‘कशाला बघता द काश्मीर फाईल्स? तुम्ही फिल्म बघणार, दुसऱ्या दिवशी फळं मात्र बागवानकडून, ब्रेड मुस्लिम बेकरीतून आणि देवाला हार मुस्लिम व्यापाऱ्यांकडून, चिकन न चुकता कोपऱ्यावरच्या रहिमचाचाकडून घेणार. स्वत:च्या मुलाला कधी शाखेमध्ये पाठवणार नसाल आणि ईदला मुस्लिम मोहल्ल्यात झेंडे लावायला जाणार. असाच भाईचारा वाढवत राहिलात तर कदाचित घराजवळ किंवा घरातच काश्मीर फाईल्स बघायला मिळेल. मग कशाला थेटरला जाताय…? कोणत्या विषारी वेलींची लागवड केली जातेय अशा मेसेजेसमुळं? आणि का? कोणत्या आणि का या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तरी चालतील पण कोण हे विष पसरवतंय ? हे समजलं तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

हेही वाचा

Back to top button