

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी ऑनलाइन नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत या वर्षीदेखील ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी 2 लाख 12 हजार 595 हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसर्या क्रमांकावर केळी, तर तिसर्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली असून, मोसंबी आणि द्राक्षे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. नगदी पिकांच्या लागवडीबरोबरच हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांचीदेखील आकडेवारी या उपयोजनच्या (अॅप) माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.
महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या अॅपमध्ये करता येते. शेतकरीच या अॅपमध्ये पिकांची माहिती तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात. जर संबंधित शेतकर्याने पिकांची नोंद ई-पीक पाहणी अॅपमध्ये न केल्यास ती तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार 2022-23 या वर्षांसाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाल्याचे दिसून आले.
ऊसक्षेत्रात आणखी वाढ होण्याचे संकेत
राज्यातील केवळ पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ऊस हे नगदी पीक घेण्याची जोरदार स्पर्धा होती. आता मात्र ही स्पर्धा राज्यभर पोहचली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच विभागांत मिळून दोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची नोंदणी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत आतादेखील ऊस या नगदी पिकाचे उत्पादन वाढू लागल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणीनुसार ही लागवड ऑगस्टपासून गृहीत धरलेली आहे. पुढील वर्षी ऊस या नगदी पिकाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :