पैशासाठी ठरलेले लग्न मोडले; पोलिस भावा-बहिणींवर गुन्हा दाखल | पुढारी

पैशासाठी ठरलेले लग्न मोडले; पोलिस भावा-बहिणींवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पैशांसाठी ठरलेले लग्न मोडून मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी दोघा भावा-बहिणींविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही शहर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आसिफ फक्रुद्दीन पठाण (वय 27, रा. विश्रांतवाडी पोलिस लाइन), रुकय्या फक्रुद्दीन पठाण (वय 31, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भवानी पेठ येथील 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2022 ते मे 2023 यादरम्यान हा प्रकार घडला.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये फिर्यादी यांना आसिफ याच्या लग्नासाठी स्थळ आले होते. फिर्यादी पसंत पडल्यानंतर सर्वानुमते 23 ऑक्टोबर रोजी कोंढवा येथे साखरपुडा झाला. त्यानंतर आसिफचे फिर्यादीशी फोनवर बोलणे सुरू झाले. यादरम्यान फिर्यादीच्या घरच्यांनी घरगुती वापराचे काही साहित्य आसिफला दिले. मात्र, 15 लाख सोसायटी काढली असून, तिचे कर्ज परत करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दहा लाख रुपये घेऊन दे, असे आसिफ फिर्यादीला म्हणाला. यावरूनच त्यांच्यात मतभेद झाले. 21 मे रोजी लग्नाची तारीख ठरली असताना काही दिवस अगोदरच आसिफची बहीण साहित्य घेऊन ते परत करण्यासाठी फिर्यादीच्या घरी आली. त्यामुळे लग्नासाठी खर्च करण्यास भाग पाडून समाजामध्ये बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास समर्थ पोलिस करीत आहेत.

Back to top button