बारामती : लहानग्याच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात यश

एक्स - रे मध्ये घशात अडकलेली सेफ्टी पिन दिसत असून उजवीकडे बाहेर काढलेली पिन
एक्स - रे मध्ये घशात अडकलेली सेफ्टी पिन दिसत असून उजवीकडे बाहेर काढलेली पिन
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

घरामध्ये खेळत असताना जमिनीवर पडलेली सेफ्टी पिन लहानग्या बालकाने गिळली. ती त्याच्या घशात जावून अडकली. विशेष म्हणजे घशात अडकलेली ही पिन उघडलेल्या स्थितीत होती. त्यामुळे या बालकाचा जीव कासावीस होवू लागला. तो क्षणाक्षणाला अत्यवस्थ होवू लागला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ बारामतीच्या श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता प्रसिद्ध बाल आरोग्य तज्ञ डाॅ. राजेंद्र मुथा व सौरभ मुथा यांनी तात्काळ ब्राॅन्कोस्कोपी करत या बालकाला जीवदान दिले.

शस्त्रक्रियेनंतर लहानग्या कार्तिकच्या आई-वडीलांसह डावीकडे डाॅ. राजेंद्र मुथा, उजवीकडे डाॅ. सौरभ मुथा
शस्त्रक्रियेनंतर लहानग्या कार्तिकच्या आई-वडीलांसह डावीकडे डाॅ. राजेंद्र मुथा, उजवीकडे डाॅ. सौरभ मुथा

उघडलेल्या अवस्थेतील पिनमुळे बालक अत्यवस्थ

बारामतीनजीकच्या पिंपळी येथील कार्तिक अमोल केसकर या १८ महिन्याच्या बालकाबाबत मंगळवारी रात्री ही घटना घडली. घरामध्ये खेळत असलेल्या कार्तिकने अजाणतेपणे फरशीवर पडलेली सेफ्टी पिन हातात घेत ती तोंडात घातली. उघडलेल्या अवस्थेत असलेली ही पिन नेमकी त्याच्या घशाच्या मध्यभागी अडकली. त्यामुळे कार्तिकला प्रचंड वेदना होवू लागल्या. तो उलट्या करू लागला. परंतु अडकलेली पिन पडली नाही. कुटुंबियांनी त्याला तात्काळ बारामतीतील एका रुग्णालयात आणले. तेथील डाॅक्टरांनी परिस्थिती लक्षात घेत श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कार्तिकच्या आई-वडीलांना दिला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्याला श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ब्राॅन्कोस्कोपीद्वारे काढली पिन

डाॅ. राजेंद्र मुथा यांनी कार्तिकचा एक्स रे काढला असात त्याच्या घशात उघडलेल्या अवस्थेत सेफ्टी पिन अडकलेली दिसून आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डाॅ. वैभव मदने, भूलतज्ज्ञ डाॅ. अमर पवार यांच्या मदतीने उपचार सुरु केले. कार्तिक याला भूल देत ब्राॅन्कोस्कोपी करत त्याच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर काढण्यात आली. त्यामुळे या बालकाला जीवदान मिळाले. घशात अडकलेली ही सेफ्टी पिन खाली सरकली असती तर त्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोहोचली असती. त्यानंतर मात्र या बालकाच्या जीविताला धोका निर्माण झाला असता असे डाॅ. राजेंद्र मुथा व सौरभ मुथा यांनी सांगितले. दरम्यान चिमुकल्याचा जीव वाचल्याने सदगदीत झालेल्या कार्तिकच्या मातेने डाॅ. मुथा यांचे आभार मानले.

लहान मुलांच्या हाती कोणत्याही वस्तू लागू नयेत याची पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. घरामध्ये खेळताना अनेकदा ही मुले हाती लागेल ती वस्तू तोंडात टाकतात. अगदी स्वयंपाकगृहात आईच्या मागे धावणारे मुल सहजपणे शेंगदाणा तोंडात टाकते. तो अनेकदा त्यांच्या घशात अडकून बसतो. विशेषतः टोकदार वस्तू तोंडात टाकल्यानंतर तर अधिक गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे पालकांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
                                                          – डाॅ. राजेंद्र मुथा, बाल आरोग्यतज्ज्ञ, बारामती

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news