

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी मराठा समाजसाठी काय केले यासाठी कोणाचाही दाखल्याची गरज नाही. मी काय केले आहे ते सर्वांना माहित आहे. मी नेहमीच वाईटाला वाईटच म्हटलं आहे. कधीच चुकीचे समर्थन केलेले नाही, असे स्पष्ट करत आज आपलं राजकारण जातीच्या नावाखाली कोणत्या थराला गेले आहे? आपण समाजाला विघटीत करण्याचे राजकारण करणार असलो तर आपण कोठे चाललो आहोत? मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी कोणी पैसे दिले?, अशी सवालांची सरबत्ती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२७) विधानसभेत मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला माझ्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलायचेच नव्हते. मात्र याबाबतचे राजकारण आता समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी झालेली आंदोलने शांततेत पार पडली होती. मात्र यावेळी झालेल्या आंदोलनात शांतता नव्हती. या आंदोलनाला हिंसक वळण कोणी लावले, याचा शोध घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजासाठी मी काय केले हे सर्वांना माहित आहे. मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत आरक्षण टिकवले. सारथी सारखी संस्था असो की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलती, वसतीगृह सुविधा अशा उपक्रमांबाबत सरकारने निर्णय घेतले, असेही फडणवीस म्हणाले.
मनोज जरांगे-पाटील यांनी माझ्यावर आरोप केल्यानंतर आज मराठे माझ्या मागे उभे राहिले आहेत. मराठा आंदोलनावेळी लाठीमार का झाला, यावेळी हिंसाचार कोणी घडवून आणला यामागील षड्यंत्र बाहेर येतेय.आंदोलनाला हिंसक वळण लावण्यासाठी कोणी पैसे दिले, याचा शोध घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
आज सभागृहात सत्ताधारी असो की, विरोधक कोणावरही चुकीची टीका किंवा कृती झाली तर आम्ही त्यांच्या मागे उभे राहतो. आज आमच्या टीका झाली तर तुम्ही असे झाले तर तसे झाले नसते, असे म्हणत राजकारण करत आहात. मात्र तुमच्याबाबत असे घडलं तर हा देवेंद्र फडणवीस सभागृहात तुमच्या वतीने बोलेल, असे खडेबोलही त्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना सुनावले.
हेही वाचा :