

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने 2016 केलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने 4 विरुध्द 1 अशा मत फरकाने सोमवारी दिला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य असल्याचे सांगत केंद्राला दिलासा दिल्याचे मानले जात आहे.
न्यायमूर्ती नागरत्ना यांनी चार न्यायमूर्तींच्या पेक्षा वेगळे मत व्यक्त केले. कायद्याच्या माध्यमातून नोटाबंदी करावयास हवी होती. नोटाबंदीची सुरुवात कायद्याच्या विरोधातील होती. याबाबत ज्या अधिनियमांचा हवाला देण्यात आला आणि जो अध्यादेश काढण्यात आला, तेही कायद्याला धरुन नव्हते. याचमुळे देशवासियांना नोटाबंदी केल्यानंतर मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. मात्र असे असले तरी संबंधित निर्णय 2016 साली घेण्यात आलेला असल्याने त्यात आता बदल केले जाउ शकत नाहीत, असे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी म्हटले आहे.