इस्लामाबाद : वृत्तसंस्था, पाकिस्तानात तालिबानने समांतर सरकारची घोषणा केली असून, संरक्षण, अर्थ, शिक्षण यांसह अनेक खाती तयार केली आहेत. फतव्यांसाठी विशेष मंत्रालय तयार करण्यात आले आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सोयीसाठी उत्तर व दक्षिण पाकिस्तान, अशी विभागणी केली असून, आत्मघातकी दहशतवाद्यांच्या ब्रिगेडची स्थापना व दोन प्रशिक्षण केंद्रांची घोषणाही केली आहे. एवढेच नव्हे; तर बलुचिस्तानातील एक बंडखोर संघटना तालिबानमध्ये विलीन करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला खुले आव्हान देत तहरीक ए तालिबान पाकिस्तानने शनिवारी समांतर सरकारची घोषणा करीत प्रशासकीय सोयीसाठी देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग केले आहेत. तालिबानने आपल्या समांतर सरकारातील मंत्रालयांचीही घोषणा केली. त्यानुसार संरक्षण, न्याय, माहिती प्रसारण, गुप्तचर, राजकीय व्यवहार, अर्थ, शिक्षण, बांधकाम आणि फतवा, अशी विविध मंत्रालये स्थापन केली आहेत. पाकिस्तानच्या अफगाण सीमेलगतच्या भागावर तालिबानचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथील कारभार या समांतर सरकारच्या माध्यमातून चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असे असले तरी पाकिस्तानच्या इतर भागांतही मोठ्या संख्येने तालिबानचे समर्थक आहेत. त्यामुळे या समांतर सरकारमुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वालाच थेट आव्हान देण्यात आले आहे.
दहशतवादी मुजाहिम संरक्षणमंत्री
मुफ्ती मुजाहिम याच्याकडे संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आले आहे. मुफ्ती मुजाहिम याला अमेरिकेने दहशतवादी म्हणून याआधीच घोषित केले आहे. संरक्षण मंत्रालय दक्षिण व उत्तर पाकिस्तान, असे दोन विभागांत विभागण्यात आले असून, उत्तर भागात पेशावर, मलकांद, मर्दान, गिलगिट, बाल्टिस्तान, हजारा हे भाग असतील; तर दक्षिण भागात डेरा इस्माईल खान, बन्नू, कोहात, झोब यांचा समावेश आहे.
'स्पेशल इश्तशादी फोर्स' या नावाने विशेष आत्मघातकी दलाची स्थापना करण्यात आली असून, ते थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणार आहे. याशिवाय लाहोरच्या अल फारूख फाऊंडेशनच्या वतीने या आत्मघातकी दलाच्या प्रशिक्षणासाठी दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
बलुची दहशतवादी गट तालिबानमध्ये
दक्षिण बलुचिस्तानच्या मकरान जिल्ह्यातील फुटीरवादी नेता मजार बलोचच्या नेतृत्वा-खालील दहशतवादी गट टीटीपीमध्ये सामील झाला आहे, असे तालिबानचा प्रवक्ता मुहम्मद खुरासानी याने एका निवेदनात म्हटले आहे. यावर्षी जूनमध्ये अस्लम बलोचच्या नेतृत्वाखालील बलूच दहशतवाद्यांचा एक गट टीटीपीमध्ये सामील झाला होता. ताज्या विलीनीकरणामुळे जुलै २०२० पासून अफगाण तालिबानच्या मदतीने बंडखोरांनी समेटाची प्रक्रिया सुरू केल्यावर तालिबानमध्ये सामील झालेल्या गटांची संख्या २२ वर पोहोचली आहे.
एक नजर तालिबानवर
स्थापना २००७
संस्थापक : बैतुल्ला मसूद
• सध्याचा प्रमुख : नूर वली महसूद
विभाजन : : २०१४
गट दोन अफगाणिस्तान तालिबान आणि पाकिस्तान तालिबान
दहशतवाद्यांची संख्या : अफगाणिस्तान- ४ ते ६ हजार, पाकिस्तान – ७ ते १० हजार
हे ही वाचा :