

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन
"लोकशाहीची (Democracy) भावना ही भारताच्या सभ्यतेचा अविभाज्य घटक आहे. शतकानुशतके राज्य करणाऱ्या वसाहतवादी राजवटीलादेखील भारतीय लोकांच्या लोकशाही भावनेला दडपता आले नाही. २५०० वर्षांपूर्वी लिच्छवी, शाक्य ही प्रजासत्ताक राज्येदेखील भरभराटीला आलेली होती", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन लोकशाही शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी इतिहासातील दाखले देत म्हणाले की, "१० शतकातील उत्तरमेरूर शिलालेखातही लोकशाहीची भावना दिसून येते. कारण, त्यात लोकशाहीती मूल्ये दिसून येतात. लोकशाहीची प्रेरणेने आणि तत्त्वांनीच ही प्राचीन भारताला समृद्ध केले."
"भारतीयांच्या लोकशाही (Democracy) भावनेला वसाहतवादी राजवटीतादेखील दडपता आलेलं नाही. मागील ७५ वर्षांमध्ये भारतीय स्वातंत्र्यांची अभिव्यक्ती दिसून आली. ही राष्ट्रनिर्मितीमधील लोकशाहीचे अतुलनीय कथा आहे. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वसमावेशकतेची कथा आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अकल्पनीन विकासाची कथा आहे", असेही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.
मोदी पुढे म्हणाले की, "बहुपक्षीय निवडणुका, स्वतंत्र न्यायपालिका आणि माध्यमांची मुक्तता ही लोकशाही महत्त्वाची अंग आहेत. लोकशाहीच्या प्रेरणेची आणि तत्त्वांचा आत्मा समाज आणि नागरिक आहेत. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे केवळ लोकशाही नाही, तर लोकांमध्ये असणारं राज्य म्हणजे लोकशाही आहे", असं प्रतिपादन नरेंद्र मोदींनी केलं.
लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयांवर ही परिषद आयोजित केलेली होती. त्यामध्ये मानवी हक्कांचे रक्षण, वैयक्तिक आणि सामुहिक वचनबद्धता, लोकशाहीतील सुधारणा या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा होण्याची जो बायडेन यांनी 'समिट फाॅर डेमोक्रसी' ही परिषद आयोजित केलेली होती. त्यात १०० हून अधिक प्रतिनिधिंनी सहभाग घेतला.
उद्घाटनाच्या भाषणात जो बायडेन यांनी नागरी हक्क कार्यकर्ते जाॅन लुईस यांच्या कार्याचा उल्लेख केला. लुईस हे लोकशाही आणि नागरी हक्कांचे कैवारी होते. त्यांनी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याकडून प्रेरणा घेतली, याचा उल्लेखही जो बायडेन यांनी या लोकशाही परिषदेत केला.
पहा व्हिडीओ : कोरोना काळात जिवाची बाजी लावणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा दै. पुढारीने केला सन्मान | दैनिक पुढारी