उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दिल्लीला देखील तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. पावसामुळे यमुना नदीने पूर पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी आणखी वाढले तर प्राणहानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन दिल्ली प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या हजारो लोकांना पूर्व, ईशान्य, उत्तर, मध्य, दक्षिण पूर्व दिल्लीसह शाहदरा या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलविले आहे. दरम्यान तीन दिवसांच्या पावसानंतर मंगळवारी दिल्लीत पावसाने उसंत घेतली होती.