

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गो, गो, गो गोविंदा!चा आवाज, दहीहंडीचा जल्लोष; तरुणांची तुफान गर्दी… कलाकारांचा सहभाग, शिस्तप्रिय स्वयंसेवक, पावसाच्या सरीमध्ये डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई, लेसरच्या प्रकाशात आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. मानाच्या या दहिहंडी गोविंदांनी सात थर लावून फोडली.
गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, आरएमडी ग्रुपच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन, संगीतकार आणि गायक अजय-अतुल, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, अभिनेते प्रवीण तरडे, ईशान्य महेश्वरी, डीजे तपेश्वरी, डीजे अखिल तलरेजा आदी कलाकार व नामवंत खेळाडू उपस्थित होते. शेकडो बालगोपालांसह हजारो तरुणाईच्या उत्साहात कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. दहीहंडी संघाने सात थर लावून रात्री 9.45 वाजता दहीहंडी फोडली.
लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेली विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचे वेगळेपण अधोरेखित होत होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखीन आकर्षक करत होते. शेकडो बालगोपाल, हजारो तरूण-तरूणींनी डीजेच्या तालावर ठेका धरत मनमुराद नृत्य केले.
यावेळी बोलताना उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, हा महोत्सव सर्वांना मनातून आनंद देणारा ठरला आहे. दहीहंडी फोडल्यानंतर हजारो तरूणांनी परत एकदा डीजेच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर दहीहंडी महोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गुरूवारी सायंकाळपासून मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडी महोत्सवाचा तयारीत होते. सायंकाळनंतर पुण्यातील ढोल ताशे पथकाने रंगत आणली, समर्थ, गजर, शिवताल ढोल पथकांनी वादन करून आपला ताल आणि ठेका सादर करत तरुणाई मध्ये उत्साह दिसून आला.
.हेही वाचलं का