तळोजामध्ये ६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी  | पुढारी

तळोजामध्ये ६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी 

पनवेल, पुढारी वृत्तेसवा : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा, सेक्टर – २२ आणि पिसार्वे गांव अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन तब्बल ६५ लाख रुपये किंमतीचे ६५० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या दोघांनी सदरचे अंमली पदार्थ कोणाकडून आणले होते ? तसेच ते कुणाला विक्री करणार होते? याचा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

तळोजा फेज-२ सेक्टर- २२ मधील मारवा बिल्डींग जवळ एक व्यक्ती अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने तळोजा, सेक्टर २२ मधील मारवा बिल्डींग जवळ सापळा लावला होता. यावेळी सदर ठिकाणी संशयास्पदरित्या आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ तब्बल ५० लाख रुपये किंमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे पारदर्शक स्फटीकासारखे कण असलेली मेफेड्रोन (एमडी) आढळून आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याजवळ सापडलेले मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक केली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा फेज-२ भागातील पिसार्वे गांव येथील आनंद बिल्डींग समोरील मोकळ्या मैदानाजवळ सापळा लावून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी फॉर्च्यूनर कारमधून आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीला पकडले. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १५ लाख रुपये किंमतीचे १५० ग्रॅम वजनाचे पारदर्शक स्फटीकासारखे कण असलेली मेफेड्रॉन (एमडी) पावडर सापडली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याची ५० लाख रुपयांची फॉर्च्यूनर कार देखील जप्त केली आहे.

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरचे अंमली पदार्थ त्यांनी कोणत्या ठिकाणावरुन आणले ? त्याचे पुरवठादार आणि इतर विक्रेते कोण आहेत? याबाबत अधिक तपास सुरु आहे.

– नीरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक – अंमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई

हेही वाचलंत का?

Back to top button