

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
बंगालच्या उपसागरात 'जवाद' चक्रीवादळ (Jawad Cyclone) काही प्रमाणात कमकुवत झाले आहे. हे वादळ उत्तर-पूर्व दिशेने बंगाल किनारपट्टीकडे वळले आहे. वाऱ्याचा वेगही ताशी ११ किलोमीटर इतका कमी झाला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, जवाद आज (दि. ५) दुपारी ओडिशाच्या पुरी किनारपट्टीला धडकू शकतो. दरम्यान आताही ओडिशाच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. बंगालमध्येही दिघाजवळील समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, वादळ आणखी कमकुवत होऊन पुढील २४ तासांत शांत होऊ शकते, परंतु यादरम्यान पश्चिम बंगालच्या किनारी भागात आणि झारखंडच्या काही भागात पाऊस पडू शकतो. बंगालशिवाय ओडिशा आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
'जवाद' चक्रीवादळ ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे जात असताना, पश्चिम बंगाल सरकारने काल (दि.०४) दक्षिण २४ परगणा आणि पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तसेच पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. सकाळपासून महानगर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, हावडा आणि हुगळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.
जवाद गेल्या सहा तासात ताशी ४ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. सकाळी ५.३० वाजता विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशपासून २३० किमी दक्षिणेस आहे. पूर्व, मध्य ३४० किमी दक्षिणेकडे आहे. ओडिशातील गोपालपूर, पुरी (ओडिसा) च्या ४१० किमी आग्नेय-पूर्व आणि पारादीप (ओडिशा) च्या ४९० किमी आग्नेय-पूर्वेस.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण २४ परगणा आणि पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यात प्रशासनाने किनारपट्टी भागातील सुमारे ११,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे, तर मच्छीमार त्यांच्या बोटीसह काकद्वीप, दिघा, शंकरपूर आणि इतर किनारपट्टी भागात हलवण्यात आले आहेत.
वादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल आणि नंतर ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. ते ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पुरीपर्यंत पोहोचून कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे.
वादळ पुरी किनारपट्टीपर्यंत पोहोचेपर्यंत कमकुवत होऊ शकते असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. बचाव पथके पर्यटक आणि स्थानिकांना दिघा, शंकरपूर, ताजपूर आणि बकखली येथील समुद्रकिनारे रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या एकूण १९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, झारग्राम, हुगळी आणि हावडा जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, नादिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्येही उद्या (दि. ०६) सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.