एका सापामुळे जळाले घर! | पुढारी

एका सापामुळे जळाले घर!

न्यूयॉर्क : अमेरिकेत मेरीलँडमध्ये राहणार्‍या एका व्यक्तीला घरामागे एक साप असल्याचे दिसून आले. या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना किंवा वनविभागाच्या कर्मचार्‍यांना बोलावण्याऐवजी त्याने त्याला मारण्याचे ठरवले. त्याच्या या आततायीपणामुळे पुढे जे घडले ते त्याच्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखेच होते. या सापामुळे त्याचे घर जळाले आणि त्याला पश्चात्ताप करण्याची वेळ आली!

घरामागे साप दिसताच या माणसाने एक जळता कोळसा घेऊन त्याने तो सापाच्या दिशेने फेकला. मात्र, याच निखार्‍याने त्याच्या घरालाच आग लावली आणि बघता बघता संपूर्ण घर जळून खाक झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 75 फायर फायटर्स पाठवले होते. अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घर जळून खाक झाले होते. त्यामुळे या व्यक्तीचे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व घटनेत संबंधित सापाचे काय झाले हे मात्र समजू शकले नाही. आधी ही आग बेसमेंटपासून सुरू झाली आणि ती सर्व घरात पसरली. मागे एकदा एका तरुणाने घरात दिसलेल्या कोळ्याला मारण्याच्या प्रयत्नात आपल्या घराला आग लावली होती!

Back to top button