‘या’ बेटावर मसाला म्हणून करतात मातीचा वापर! | पुढारी

‘या’ बेटावर मसाला म्हणून करतात मातीचा वापर!

तेहराण : एखाद्या व्यक्तीने काही चूक केली तर त्याला ‘माती खाल्लीस का?’ असे म्हटले जाते. मात्र, जगाच्या पाठीवर एक बेट असे आहे जिथे खरोखरच माती खाल्ली जाते. अर्थात लहान मुलं माती खातात तसा प्रकार तिथे होत नाही. या बेटावरील लोक स्वयंपाक करीत असतानाच चवीसाठी एक मसाला म्हणून मातीचा वापर करतात.

हे इराणचे बेट असून त्याचे नाव होर्मुझ असे आहे. या बेटावरील माती सुगंधी आणि स्वादिष्ट असते असे मानले जाते. त्यामुळे तेथील लोक या मातीचा रोजच्या जेवणात मसाल्यासारखा वापर करतात. या मातीमुळे खाद्यपदार्थ अधिक स्वादिष्ट बनतात असे म्हटले जाते. अर्थात ही माती एकाच प्रकारच्या चवीची नाही. तेथील डोंगरांमध्ये वेगवेगळ्या चवीची माती मिळते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या मातीचा लोक स्वयंपाक बनवत असताना खुबीने वापर करतात.

कोणत्या पदार्थात कोणत्या चवीची माती मिसळल्याने त्या पदार्थाची लज्जत आणखी वाढेल याचे ज्ञान तेथील लोकांना असते. होर्मुझ बेट हे पर्शियन गल्फजवळ आहे. या बेटाला इंद्रधनुष्यी बेट असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे या बेटावर रंगीबेरंगी डोंगर आहेत. या डोंगरांवर लाल, पिवळ्या, तपकिरी, निळ्या आणि हिरव्या छटा दिसतात.

तेथील माती केवळ स्वादिष्टच नव्हे तर पौष्टिकही असल्याचे सांगितले जाते. येथील ‘सुराघ’ नावाचा पारंपरिक पदार्थ इराणमध्ये लोकप्रिय आहे. ब्रिटनच्या मुख्य भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. कॅथरीन गुडइनफ यांनी सांगितले की या डोंगरांवर लाखो वर्षांपासून विविध खनिजे साठत आहेत. त्यांचे रूपांतर मातीत झाले असून तिच्या रूचकरपणाचे रहस्य या खनिजांमध्येच आहे. स्थानिक लोक मातीचा रंग पाहून तिची चवही ओळखतात.

Back to top button