

बारामती : पुढारी वृत्तसेवा
सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात अनिल बबन बनकर (रा. टिळेकरवस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेप व १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. १८ जून २०२० रोजी पिलानवाडीतील एका पोल्ट्री फार्मवर ही घटना घडली होती. यवत पोलिस ठाण्यात यासंबंधी पिडीतेच्या आईने फिर्याद दिली होती.
फिर्यादीत नमूद मजकूरानुसार, घटनेदिवशी फिर्यादी ही भाजीपाला आणण्यासाठी राहू येथे गेली होती. यावेळी पीडित मुलगी व तिचे बहिण-भाऊ पोल्ट्रीजवळ खेळत होते. आरोपीने तेथे येत पीडितेच्या बहिण-भावाला बाहेर जाण्यास सांगून पीडितेला पोल्ट्रीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही बाब आई-वडिलांना सांगितली तर पोटात चाकू मारीन अशी धमकी दिली होती. आरोपीविरुद्ध पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी या खटल्याचे कामकाज पाहताना सात साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ६ नुसार जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तर कलम १० नुसार ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम १२ प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील १० हजारांची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलिस नाईक वेनुनाद ढोपरे, एन. ए. नलवडे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आणि आरोपी बनकर हा न्यायालयीन बंदी असल्याने हा खटला त्वरीत चालवला गेला. न्यायालयात जबाब देताना पीडिता सात वर्षांची होती. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडितेची आई फितूर झाली. फिर्यादीच्या विसंगत तिने जबाब दिला. परंतु पीडितेने मात्र घटना सविस्तरपणे सांगितली. डाॅ. शशिकला एम. यांचा न्याय वैद्यकिय पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षी खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.