

लिस्बन; वृत्तसंस्था : फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आता आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आला असून निवृत्तीनंतर तो आपले आयुष्य मायदेशात म्हणजे पोर्तुगालमध्ये घालवणार आहे. अमाप संपत्तीचा मालक असलेल्या रोनाल्डो त्यासाठी एक आलिशान घर बांधत आहे. इतके सगळे असूनही रोनाल्डोला एक गोष्ट मात्र मनासारखी मिळत नाही. त्याला सर्वगुणसंपन्न शेफ म्हणजेच आचारी मिळत नाही. रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जिया सध्या हे दोघेही चांगल्या कूकच्या शोधात असून त्यासाठी ते महिना साडेचार लाख रुपये पगार देण्यास तयार आहेत. (Cristiano Ronaldo)
37 वर्षीय रोनाल्डोने 2021 मध्ये पोर्तुगालमधील क्विंटा दा मारिन्हा येथे कुटुंबासाठी जमिन विकत घेतली होती. यावर सुमारे 150 कोटी रुपयांचा आलिशान व्हिला जूनपर्यंत तयार होईल. यापूर्वी त्याने घरासाठी बटलर, स्वयंपाकी, क्लीनर आणि माळी यांना दरमहा साडेपाच लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. (Cristiano Ronaldo)
यानंतर त्याने एका बटलरला साडेचार लाखांहून अधिक पगारावर नोकरी दिली, मात्र शेफची जागा अद्यापही रिक्त आहे. रोनाल्डोला जपानी सुशी खायला आवडते; परंतु त्याची आई डोलोरेस एवेरोने सांगितले की त्याची आवडती डीश बाकालहाऊ-ब्रेस या मासळीची आहे, जो मीठ, बटाटे, अंडी घालून बनवला जात असून तो एक पारंपरिक पोर्तुगीज पदार्थ आहे.
रोनाल्डोच्या व्हिलामध्ये टेनिस कोर्ट, आऊटडोअर पूल, जिम आणि गॅरेज आहे. ज्यामध्ये एकावेळी 20 कार पार्क केल्या जाऊ शकतात. रोनाल्डो आणि त्याचे कुटुंब सध्या रियाधमधील फोर सिझन हॉटेलमध्ये एका सूटमध्ये राहत आहेत. रोनाल्डो 22 जानेवारीला सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबमधून पदार्पण करणार आहे.
मैत्रीपूर्ण सामन्यातून मिळाले 88 कोटी रुपये
गुरुवारी, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) आणि रियाध इलेव्हन (अल नसर आणि अल हिलाल) यांच्यात मैत्रीपूर्ण सामना झाला. रिपोर्टसनुसार या मॅचमधून रोनाल्डोला 8.8 मिलियन पौंड (सुमारे 88 कोटी रुपये) मिळाले आहेत. या सामन्यात रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी आमने-सामने भिडले. पीएसजीने अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रियाध इलेव्हनचा 5-4 असा पराभव केला.
हेही वाचा;