Virat Kohli Test Century : कसोटीत विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपेल का?

Virat Kohli Test Century : कसोटीत विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपेल का?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Test Century : जवळपास तीन वर्षे फॉर्म गमावलेल्या विराट कोहलीने 2022 च्या शेवटच्या महिन्यांत दमदार पुनरागमन केले. त्याने आपल्या कारकिर्दीतील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावून वनडे क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळही संपुष्टात आणला. मात्र, तो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये जुन्या शैलीत दिसलेला नाही. अशा परिस्थितीत 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट शतकाची प्रतीक्षा संपवू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर मालिका सुरू झाल्यानंतरच मिळणार आहे.

1172 दिवसांपासून कोहलीचा संघर्ष

विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. आता त्या शतकी खेळीला जवळपास 1172 दिवस उलटले आहेत. तेव्हापासून तो 20 कसोटी सामने खेळला. त्यात त्याने सहा अर्धशतके पूर्ण केली, पण शतकाने भारताच्त्या रन मशिनला हुलकावणी दिली. यादरम्यान विराटची सरासरीही 26.20 इतकीच राहिली आणि त्याला केवळ 917 धावा करता आल्या. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेतही तो फार काही करू शकला नाही. त्याने 2 सामन्यात केवळ 45 धावा केल्या. (Virat Kohli Test Century)

कांगारूंच्या मागील दौऱ्यात कोहली अपयशी

कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम खूप प्रभावी असला तरी भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जास्त काही चाललेली नाही. 2017 च्या मालिकेत विराटला 3 सामन्यात केवळ 46 धावा करता आल्या होत्या. दुखापतीमुळे तो एका कसोटी सामन्यालाही मुकला होता. त्या मालिकेतही त्याची सरासरी 9.20 इतकीच राहिली. यापूर्वी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी विराटने 4 सामन्यात 1 शतकाच्या जोरावर 217 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीला आतापर्यंत 7 कसोटीत केवळ 1 शतक झळकावता आले आहे. (Virat Kohli Test Century)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगले रेकॉर्ड

भारतीय मैदानांवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कोहलीचे प्रदर्शन जरी निराशाजन असले तरी त्याची बॅटने ऑस्ट्रेलियात जोरदार धावा वसूल केल्या आहेत. त्याने 7 पैकी 6 शतके ऑस्ट्रेलियन मैदानावर झळकवली आहेत. त्यामुळे कांगारूंविरुद्धची त्याची कामगिरी एकूणच चांगली राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 48.05 च्या सरासरीने एकूण 1,682 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

नॅथन लायनचा धोका

या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन विराट कोहलीसमोर सर्वात मोठे आव्हान ठरू शकतो. लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा कोहलीला बाद केले आहे. जगातील इतर कोणत्याही गोलंदाजाने कोहलीला या फॉरमॅटमध्ये लायनपेक्षा जास्त वेळा बाद केले नाही. इंग्लंडचा जेम्स अँडरसन निश्चितपणे लायनच्या बरोबरीने आहे. पण भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटू लायन कोहलीसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्याने भारतातील 6 सामन्यांमध्ये विराटला 4 वेळा बाद केले. यामध्ये 3 वेळा एलबीडब्ल्यू होऊन त्याला माघारी परतावे लागले आहे. लायनविरुद्ध विराटची एकूण सरासरी 50.42 आहे, तर भारतीय मैदानांवरील सरासरी 40.25 आहे.

कमिन्सही ठरू शकतो त्रासदायक

लायन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा देखील विराटसाठी त्रासदायक ठरू शकतो. कमिन्सने विराटला 6 सामन्यांत 5 वेळा बाद केले आहे. यादरम्यान कोहलीची सरासरीही 27.20 इतकीच राहिली आहे. मात्र, भारतात विराटसमोर कमिन्सने फक्त एकदाच गोलंदाजी केली आहे. कमिन्सशिवाय जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी 11-11 सामन्यांमध्ये कोहलीला 3-3 वेळा बाद केले आहे.

टी-20, वनडेतील फॉर्म कसोटीत कायम ठेवण्याचे आव्हान

टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये कोहलीने दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने मागील वर्षी (2022) आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध पहिले टी-20 शतक झळकावल्यानंतर, ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेतही धावांचा पाऊस पाडला. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा (296) फलंदाज ठरला. या जागतिक स्पर्धेनंतर विराटने बांगलादेशविरुद्ध वन-डे तील शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. एवढेच नाही तर त्याने 2023 वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध दोन शतके फटकावून आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. आता त्याची ही चमकदार लय कसोटी क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना आनंद देईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

2017 पासून भारताचे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर वर्चस्व

भारताने 2017 मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. तर 2018-19 आणि 2020-21 मध्ये टीम इंडियाने कांगारूंवर त्यांच्याच भूमीत मात केली. त्याचवेळी, भारतात 1996 पासून ऑस्ट्रेलियन संघाने केवळ एकदाच कसोटी मालिका जिंकली आहे. 2004 मध्ये कांगारूंनी भारताचा 2-1 असा पराभव केला होता. तेव्हापासून, ऑस्ट्रेलियाने भारतात 14 कसोटी सामने खेळले, परंतु केवळ एकच सामना जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news