Tagenarine Chanderpaul : कसोटीत शतक झळकावणा-या ‘या’ आहेत बाप-लेकाच्या जोड्या! | पुढारी

Tagenarine Chanderpaul : कसोटीत शतक झळकावणा-या ‘या’ आहेत बाप-लेकाच्या जोड्या!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tagenarine Chanderpaul : वेस्ट इंडिज संघाचा युवा सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉलने झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत द्विशतक (नाबाद 207) झळकावून इतिहास रचला. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने हा पराक्रम केवळ तिसऱ्या कसोटीत केला. बुलावायो येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीत तेजनारायणने कर्णधार क्रेग ब्रेथवेट (182) सोबत पहिल्या विकेटसाठी 336 धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.

तेजनारायणचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण

26 वर्षीय तेजनारायणने डिसेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीतून त्याने छाप पाडली. पदार्पणाच्या मालिकेत तेजनारायणने दोन कसोटीत 40.00 च्या सरासरीने 160 धावा केल्या. दरम्यान, त्याने अर्धशतकही (51) फटकावले. आता त्याने करियरच्या तिस-याच कसोटीत द्विशतक झळकावून सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.

तेजनारायण-शिवनारायण या बाप-लेक जोडीने खास यादीत समावेश केला आहे. वेस्ट इंडिजसाठी, कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावणारी ही पहिली बाप-लेकाची जोडी ठरली असून असा पराक्रम करणारी ही जगातील 12 वी जोडी ठरली आहे. याआधी जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये हेडली, मार्श, लॅथम, मांजरेकर, अली खान, अमरनाथ, नजर, ब्रॉड, शोएब आणि हनिफ मोहम्मद या बाप-लेकांनी शतकी खेळी साकारून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शिवनारायण-तेजनारायण चंद्रपॉल हे 31 कसोटी शतकांसह बाप-लेक जोडीत टॉपवर आहेत. यानंतर पाकिस्तानचे हनिफ मोहम्मद (12 शतके) आणि शोएब मोहम्मद (7) ही बाप-लेकाची जोडी 19 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी बाप-लेकाची जोडी

लाला-मोहिंदर अमरनाथ (भारत)
ख्रिस-स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
हनीफ-शोएब मोहम्मद (पाकिस्तान)
वॉल्टर-रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)
इफ्तिखार-मंसूर अली खान पतौडी (इंग्लंड, भारत)
ज्योफ-शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया)
नसर-मुदस्सर (पाकिस्तान)
केन-हमिश रदरफोर्ड (न्यूझीलंड)
विजय-संजय मांजरेकर (भारत)
डेव्ह-डडली नर्स (दक्षिण आफ्रिका)
रॉड-टॉम लाथन (न्यूझीलंड)
तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)

कसोटीत द्विशतक झळकावणारी दुसरी बाप-लेकाची जोडी

तेजनारायणचे वडील शिवनारायण चंद्रपॉल हे वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज आहेत. त्यांनी कसोटीमध्‍ये द्विशतकही (203*) केले आहे. आता तेजनारायण आणि शिवनारायण ही कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी दुसरी बाप-लेकाची जोडी ठरली आहे. याआधी पाकिस्तानचे हनिफ मुहम्मद आणि त्यांचा मुलगा शोएब मुहम्मद हे कसोटीत द्विशतक ठोकणारे बाप-लेक आहेत. शिवनारायण यांनी 11,867 कसोटी धावा केल्या आहेत. विंडीजकडून खेळताना ब्रायन लारा (11,912) नंतर सर्वाधिक धावा करणारे ते दुसरे खेळाडू आहेत.

तेजनारायणची ब्रेथवेटसोबत विक्रमी भागीदारी (Tagenarine Chanderpaul)

तेजनारायणने ब्रेथवेटसोबत पहिल्या विकेटसाठी 336 धावांची भागीदारी केली. विंडिजकडून कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. दोघांनी 33 वर्षांपूर्वीचा गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांचा इंग्लंडविरुद्ध 298 धावांचा सलामीचा विक्रम मोडीत काढला आहे. याशिवाय तेहनारायण आणि ब्रेथवेट ही 21 व्या शतकात 100 किंवा त्याहून अधिक षटके खेळणारी पहिली सलामीची जोडी ठरली. ब्रेथवेट आणि तेजनारायण यांनी मिळून 688 चेंडू खेळले, जो कोणत्याही सलामीच्या जोडीसाठी जागतिक विक्रम आहे. यापूर्वी हा पराक्रम अटापट्टू आणि जयसूर्याने केला होता. 2000 मध्ये या जोडीने पाकिस्तानविरुद्ध खेळताना 686 चेंडूंचा सामना केला होता.

विंडिजने केला डाव घोषित

तेजनारायणने 467 चेंडूत 207 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्याशिवाय कर्णधार ब्रेथवेटने 182 धावा केल्या. या दोन फलंदाजांच्या बळावर वेस्ट इंडिजने आपला पहिला डाव 6 गडी गमावून 447 धावांवर घोषित केला. दुसरीकडे, यजमान झिम्बाब्वेकडून ब्रँडन मावुताने पाच विकेट्स (5/140) घेतल्या.

Back to top button