

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS Kohli vs Smith : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मोठ्या मालिकेतील पहिला सामना नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक वेळी मोठे विक्रम मोडले जातात आणि बनवलेही जातात. यावेळी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या निशाण्यावर आहे.
कोहली आणि स्मिथ हे दोन्ही खेळाडू मास्टर-ब्लास्टरचा मोठा विक्रम मोडू शकतात. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. आता कोहली आणि स्मिथ या दोन्ही फलंदाजांना सचिनचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 65 डावांत 9 शतके झळकावली आहेत. या मालिकेच्या इतिहासात सचिनच्या बरोबरीने दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही. (IND vs AUS Kohli vs Smith)
भारताविरुद्ध स्टीव्ह स्मिथचा रेकॉर्ड नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. ऑस्ट्रेलियात किंवा भारतात, स्मिथ टीम इंडियाविरुद्ध जोरदार धावा करतो. यामुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत तो सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रसिद्ध मालिकेत स्मिथच्या नावावर अवघ्या 28 डावांत 8 शतके आहेत. सचिनची बरोबरी करण्यासाठी स्मिथला फक्त 1 शतक आणि मागे टाकण्यासाठी 2 शतकांची गरज आहे. (IND vs AUS Kohli vs Smith)
कांगारूंविरुद्ध कोहलीचा विक्रमही अप्रतिम आहे. जगातील प्रत्येक संघाविरुद्ध विराटचे आकडे भक्कम असले तरी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मात्र हा खेळाडू वेगळ्याच लयीत दिसतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराटने 36 डावात 7 शतके झळकावली आहेत. आगामी मालिकेत तो सचिनचा विक्रमही मोडण्याची दाट शक्यता आहे, असे जाणकरांचे मत आहे.
1. सचिन तेंडुलकर : 65 डावात 9 शतके
2. स्टीव्ह स्मिथ : 28 डावात 8 शतके
3. रिकी पाँटिंग : 51 डावात 8 शतके
4. विराट कोहली : 36 डावात 7 शतके
5. मायकेल क्लार्क : 40 डावात 7 शतके