

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची वस्तुनिष्ठ आकडेवारी जाहीर करण्याच्या प्रयत्नात भारत अडसर आणत आहे. भारतातील कोरोना रुग्ण मृत्यूचा आकडेवारी विरोधाभास निर्माण करणारा आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केला आहे. यावरुन आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी टिविट केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना महामारीत देशातील ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: खरं बोलत नाहीत आणि दुसर्यालाही बोलू देत नाहीत. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नागरिकांचा मृत्यू झालाच नाही, असेच ते आजही सांगत आहेत. मी यापूर्वीही म्हटलं होतं की, कोरोनामुळे देशात ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीचा एका दैनिकामधील रिपोर्टचा स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला आहे.
केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची वस्तुनिष्ठ आकडेवारी जाहीर करावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्ण मृत्यूचा आकडाही विरोधाभास निर्माण करणारा असल्याचा डब्ल्यूएचओचा दावा केंद्र सरकारने फेटाळला आहे. एखाद्या गणिती सूत्राचा वापर भारतासारख्या मोठे भौगोलिक क्षेत्र आणि प्रचंड लोकसंख्या असणार्या देशात राबवणेच योग्य ठरणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
२०२१ मध्ये जगभरात कोरोना महामारीमुळे १५ लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डब्ल्यूएचओने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे देशांनी अधिकृत जाहीर केलेल्या आकडीवारी पेक्षाही आकडेवारी दुप्पट आहे. भारतात कोरोनामुळे सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डब्ल्यूएचओने व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा ही संख्या आठ पट अधिक आहे.
हेही वाचा :