

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या एकूण 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. या पॅनलचे 15 पैकी 11 जागांवर उमेदवार विजयी झाले आहे. तर शेतकरी महाविकास आघाडी विकास पॅनलला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचाच सभापती होणार, बाजार समितीवर आमदार हरिभाऊ बागडे यांचेच वर्चस्व असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत दोन्ही पॅनलने 15-15 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर व्यापारी मतदारसंघ आणि हमाल तोलारी मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार होते.
बाजार समितीसाठी एकूण 3375 मतदारांपैकी शुक्रवारी (दि.28) 3216 मतदारांनी मतदान केले होते. शनिवारी (दि.29) सकाळी जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये मोजणी प्रक्रियेला सुरवात झाली.
सर्वात आधी हमाल व तोलारी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यातील 3 उमेदवारांमधून देविदास किर्तीशाही यांनी सर्वाधिक 211 मते मिळवून विजय मिळवला. यानंतर व्यापारी मतदारसंघाचा निकाल घोषित झाला. या मतदारसंघातून 6 उमेदवार रिंगणात होते. तर 2 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यात कन्हैय्यालाल जैस्वाल 484 आणि निलेश सेठी 428 मते मिळवून विजयी झाले. मात्र सर्वांचे लक्ष हे पॅनलच्या उमेदवारांकडे होते. काही वेळाने ग्रामपंचायत मतदारसंघाचा निकाल आला. त्यात मविआने आघाडी घेतली. या मतदारसंघातील 4 जागांपैकी 3 जागा मविआच्या पॅनलला मिळाल्या., तर भाजप-शिंदे गट पॅनलचा 1 उमेदवार विजयी झाला. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मुकेश बारहाते यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आम्रपाली काशीकर, यशवंत देवकर, डी. एच. चव्हाण, गायके, श्रीराम सोन्ने यांनी काम पाहिले.
सर्वाधिक चुरस हि सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघाच्या 7 जागांसाठी निवडणुकीत झाली. यात एकूण 18 उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघातच दोन्ही पॅनलकडून सभापतीपदाचे उमेदवार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागलेले होते. त्यात अखेर भाजपच्या गटाने बाजी मारली. मोजणीदरम्यान राधाकिसन पठाडे, अभिजित देशमुख, श्रीराम शेळके, जगन्नाथ काळे, संजय औताडे हे आघाडीवर होते. अखेर भाजपचे 6 तर मविआचा एक उमेदवार विजयी झाला. निकाल जाहीर होताच, विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत, जोरदार घोषणाबाजी होत होती.
विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
हेही वाचा