सोलापूर: कुर्डूवाडी बाजार समितीवर शिंदे बंधूचे वर्चस्व कायम; विरोधी पॅनलचा सुफडासाफ | पुढारी

सोलापूर: कुर्डूवाडी बाजार समितीवर शिंदे बंधूचे वर्चस्व कायम; विरोधी पॅनलचा सुफडासाफ

माढा; पुढारी वृत्तसेवा : कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती  निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास आघाडीने सर्व १८ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. तर विरोधी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलचा पराभव केला. आज (दि.२९) सकाळी आठ वाजता माढा येथे मतमोजणीस सुरुवात झाली.

कुर्डूवाडी बाजार समिती निवडणुकीसाठी आ. शिंदे बंधूच्या पॅनलविरोधात पारंपरिक विरोधक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिंदे विरोधक एकवटले होते. प्रचाराचा आठवडाभर मोठा धुराळा उडाला होता. एकूण ३ हजार ९८३ मतदारांपैकी ३ हजार ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांवर आ. शिंदेच्या पॅनलने मोठी आघाडी घेतली होती. आ. शिंदेच्या पॅनलला ७० ते ७५ टक्के मते मिळाली. तर विरोधी पॅनलला अवघी २० टक्के मते मिळाली. ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल तोलार मतदारसंघातही सत्ताधारी शिंदेच्या पॅनलला मोठे मताधिक्य मिळाले. व्यापारी मतदारसंघ विरोधी पॅनलचे डिपॉझिट जप्त झाले. सोसायटी मतदारसंघ विद्यमान चेअरमन आ. संजयमामा शिंदे, व्हा चेअरमन सुहास पाटील जामगावकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेले शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांना प्रतिष्ठेच्या लढतीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. शिवसेना, भाजप, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती, रयत क्रांती, संभाजी ब्रिगेड इतक्या संघटना एकत्रित येऊनही शिंदे बंधूच्या विजयाचा वारु रोखू शकले नाहीत. निकालानंतर शिंदे समर्थकांनी मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली.

हेही वाचा 

Back to top button