

राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा
रस्त्याने जात असताना समोरून किंवा मागुन दुचाकीवरून येत असेल, त्याचा धक्का बसेल म्हणून तुम्ही हटकू नका किंवा त्याला गाडी नीट चालव असेही सांगू नका अन्यथा तुम्हाला बेदम मारहाण केली जाईल. कदाचित तुम्हाला डोके फुटेपर्यंत जखमी केले जाईल. पोलीस गुन्हा दाखल करतीलही पण पुन्हा तुम्हाला त्या मार्गावर जायचे असते. म्हणून एखाद्या वाहनाचा लहान मोठा धक्का बसला तरी गुमान सहन करा असे वातावरण राजगुरूनगर शहर परिसरात सध्या पाहायला व अनुभवायला मिळत आहे.
कुणी म्हणेल काय मोगलाई माजली आहे का? तर त्याचे उत्तर हो असेल. कारण असा अनुभव शहरात अनेक ठिकाणी लहान थोरांना येत आहे. विशेष करून वयोवृद्ध नागरिकांना अशा घटनेत टार्गेट केले जात आहे. महिला-मुलींच्या छेड काढण्यासाठी सुद्धा हे प्रकार घडत आहेत.
अशाच प्रकारात भर टाकणारी एक घटना शनिवारी (दि ४) घडली. येथील एक लहान व्यावसायीक कपिल हरिभाऊ भगत (वय २२, धंदा: फँब्रिकेशन दुकान, रा. राक्षेवाडी ता. खेड) हा रात्री दुकान बंद करून घरी जायला निघाला. घराच्या जवळपास गेल्यावर समोरून एका दुचाकीवरून तिघेजण आले. गरज नसताना वेगात येऊन त्यांच्या दुचाकीचा भगत यांना धक्का लागला.
तेव्हा त्यांनी अशी गाडी चालवतात का? नीट चालवा असे ओरडून सांगितले. समजून सांगितल्याचा राग अनावर होऊन दुचाकीवरील तिघा जणांनी भगत यांना बेदम मारहाण केली. लाथाबुक्यांचा मार देऊन समाधान न झाल्याने एकाने रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. कानाला पण जखम झाली. या मारहाणीत भगत रक्तबंबाळ झाले. हा सगळा प्रकार अनेक जणांनी फक्त पाहिला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. मात्र शुल्लक बाबीवरून शहरात असे प्रकार सर्रासपणे घडू लागले आहेत.
प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थित राहु शकत नाहीत. पोलिसांचे हे काम आहे की नाही यावर चर्चा करण्यात अर्थच नाही. तसेही त्यांना तेवढेच काम नाही असे अनेकांचे सल्ले ऐकायला मिळतात. म्हणून आपल्याला त्रास झाला तरी वाहन चालकांना चांगले वागण्याचा सल्ला देऊ नका. उपदेशाचे डोस पाजू नका अन्यथा डोके फुटेल असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव करीत आहेत.