

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिल्लक अर्जित रजेचा धनादेश देण्यासाठी तब्बल एक लाखांची लाच स्वीकारणार्या महापालिकेतील बिगारी कामगाराला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. प्रवीण दत्तात्रय पासलकर (वय 50) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 61 वर्षीय निवृत्त मुकादमाने एसीबीकडे तक्रार केली होती.
तक्रारदार हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम पदावरून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा धनादेश देण्यासाठी पासलकर याने एक लाखाची लाच मागितली होती. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. या प्रकरणात एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन महापालिकेच्या आवारात सापळा लावला. त्या सापळ्यात पासलकर लाच घेताना अडकला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उप अधीक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा