

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा
संभाव्य बदनामीच्या भीतीपोटी भाजपने महापालिकेच्या पोटनिवडणुकीत (Ahmednagar by-election) चक्क उमेदवारच बदलल्याची चर्चा आहे. भाजपने अभिजित चिप्पा यांना दिलेला एबी फॉर्म रद्द करून नंतर प्रदीप परदेशी यांना एबी फॉर्म दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या सुरेश तिवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसने मात्र पाठ फिरविली. एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
'प्रभाग 9 क'च्या एका जागेसाठी 21 डिसेंबरला निवडणूक होत आहे. काल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. यावेळी आयोगाने दोन तासांची मुदत वाढवून दिल्याने सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले.
एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, आज (मंगळवारी) या अर्जांची छाननी होत आहे. माघारीसाठी 12 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पद रद्द झाल्यानंतर या पोटनिवडणुकीतही छिंदम पुन्हा रिंगणात उतरणार असल्याची किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणी निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. मात्र, ती केवळ चर्चाच ठरली. (Ahmednagar by-election)
पोटनिवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपची मात्र चांगलीच धावपळ झाली. आधी गैरसमज व नंतर बदनामीची भीती यामुळे त्यांना उमेदवार बदलावा लागल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून प्रदीप परदेशी व अभिजीत चिप्पा हे दोघे इच्छुक होते.
तसेच प्रताप परदेशी नावाच्या एका व्यक्तीनेही कोरा अर्ज नेला होता. प्रताप परदेशी याने राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्याची चर्चा सुरू होती. भाजप पदाधिकार्यांनी हा परदेशी आपलाच असल्याचा समज करून घेतला व अभिजीत चिप्पा यांना पक्षाची उमेदवारी दिली. एबी फॉर्मसह त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला.
दरम्यानच्या काळात चिप्पा हे छिंदमशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली व त्यावरून काही शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करताना भाजपच्या स्थानिक व राज्यातील नेत्यांशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावरुन भाजप ट्रोल होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर भाजप पदाधिकार्यांनी तातडीने निवडणूक कार्यालयात धाव घेतली.
तोपर्यंत पक्षाचे दुसरे इच्छुक प्रदीप परदेशी यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणारा तो परदेशी मी नव्हेच, असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्यांना दिले. (Ahmednagar by-election)
त्यानंतर परदेशी यांच्या नावाचा एबी फॉर्म तयार केला गेला. चार वाजण्याच्या सुमारास चिप्पा यांना दिलेला एबी फॉर्म ग्राह्य न धरता त्याऐवजी प्रदीप परदेशी यांना दिलेला एबी फॉर्म ग्राह्य धरावा, असे पत्र भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी निवडणूक अधिकार्यांना दिले. मात्र, छाननी वेळी निवडणूक अधिकारी यावर काय निर्णय घेतात, चिप्पा व परदेशी यांच्यापैकी कोणाचा एबी फॉर्म ग्राह्य धरला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परदेशींकडून चार पक्षांचे चार अर्ज!
भाजप उमेदवार प्रदीप परदेशी यांनी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व अपक्ष असे चार अर्ज भरले आहेत. तर भाजपचा एबी फॉर्म जोडला आहे. शिवसेनेकडून सुरेश तिवारी, मनसेचे पोपट पाथरे, अपक्ष अनुराधा साळवे, अजय साळवे, अभिजित चिप्पा, ऋषिकेश गुंडला, अमित चव्हाण, कैलास शिंदे, शादाब शेख, वंदना शेकटकर, गौरव ढोणे व संदीप वाघमारे अशा 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा