

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
एकाचवेळी मोठी रक्कम पाहून जलद अतिश्रीमंत होण्याचा हव्यास बँकेतील क्लार्कला झाला आणि सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डीसीसी) शाखेत 6 कोटींचे चोरी प्रकरण घडले. या प्रकरणी बँकेतील क्लार्कसह तिघांना मुरगोड पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये बसवराज सिद्धलिंगाप्पा हुनशीकट्टी (वय 30, रा. तोरनगट्टी, ता. रामदुर्ग), संतोष काळप्पा कंबार (वय 31, रा. यरगट्टी) व गिरीश ऊर्फ यमनाप्पा लक्ष्मण बेळवल (वय 26, रा. जिवापूर, ता. सौंदत्ती) यांचा समावेश आहे. गेल्या रविवारी, 6 मार्चला उघडकीस आलेल्या या चोरीचा आठवडाभरातच तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटकेतील बसवराज हा अनेक वर्षांपासून बँकेत कामाला आहे. बँकेत येणारी एकूण रक्कम पाहून त्याला एकदम श्रीमंत होण्याचे स्वप्न पडले आणि त्याने चोरीचे नियोजन केले. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने याचे नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने ओळखीच्या संतोष व गिरीशला सोबत घेतल्याचेही दिसून आले.
बनावट चाव्या करून घेतल्या.
ही चोरी पाच बनावट चाव्यांचा वापर करून झाली आहे. त्यामुळे बँकेतील कोणीतरी सामील असल्याचा संशय पोलिसांना होता. हा संशय खरा ठरला. बसवराजने 18 चाव्यांच्या जुडग्यातील मुख्य फाटक, मुख्य दरवाजाच्या दोन, लॉकर व स्ट्राँगरूम या पाच महत्त्वाच्या बनावट चाव्या करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजन करून गेल्या रविवारचा सुटीचा दिवस साधून शनिवारी मध्यरात्री ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण सीसीटीव्हीत येऊ नये, याची खबदरादारी घेत डीव्हीआर देखील चोरून नेला होता. चोरलेली 4 कोटी 20 लाख 98 हजार 400 रुपयांची रोकड, 1 कोटी 64 लाखांचे 3 किलो सोने, चोरीसाठी वापरलेली कार व दुचाकीही जप्त केली आहे.
कोट्यवधीची रक्कम आणि किलोने मिळालेले सोने पाहून त्यांना हर्ष झाला. परंतु, हे लपवायचे कुठे? हा प्रश्नदेखील होता. त्यामुळे बसवराजने दोघांच्या सोबतीने ही रक्कम व सोने प्लास्टिकमध्ये व्यवस्थित घालून आपल्या गावी शेतातील उसात खड्डा खणून त्यामध्ये पुरले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून पैसे पुरलेल्या ठिकाणी पुन्हा पाणीदेखील सोडले होते.
बनावट चाव्यांचा वापर झाल्याने पोलिसांनी बाहेर फारशी चौकशी न करता बँकेतील कर्मचार्यांभोवतीच तपास सुरू केला. एकेकांची चौकशी करताना बसवराजच्या वागण्याचा पोलिसांना संशय आला. त्याला बाजूला घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सोबतीला घेतलेल्यांची नावे देखील घेतली. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महानिंग नंदगावी, यांच्या मार्गदर्शनाखाली रामदूर्गचे उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरगोडचे निरीक्षक मौनेश्वर माली पाटील, बैलहोंगलचे निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, सीईएनचे निरीक्षक वीरेश दोड्डमणी, मुरगोडचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकार्यांनी याचा तपास लावला.