निपाणी, मधुकर पाटील : घरच्या हालाखीच्या परिस्थितीची बालवयातच जाणीव ठेवून त्याने कुटुंबाची जबाबदारी घेत रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. जिद्द कष्टातील सातत्य आणि मनमिळावू स्वभावाच्या जोरावर त्याने रिक्षा विकून ट्रॅक्टर खरेदी केला. थकलेले वडील,आई, पत्नी,तीन मुले यांच्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची तयारी ठेवत कष्ट करीत असताना त्याच्या डोक्यावर शेडसाठी उभी केलेली सिमेंटची पाईप डोक्यावर पडली. त्यामुळे गंभीर इजा होऊन उपचारा दरम्यान त्याचा कोल्हापूर येथे मृत्यू झाला. उत्तम शिवाजी चव्हाण (वय 42) रा. माळभाग,सौंदलगा (ता.निपाणी) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर कुटुंबाची संसारवेल फुलविणाऱ्या `उत्तम` याचा अकाली मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 22 रोजी सायंकाळी मयत उत्तम हा आपल्या मित्रांसमवेत घराशेजारी असलेल्या शेडसाठी उभा केलेली सिमेंटची पाईप पोकलँड मशीनच्या साह्याने बाजूला घेत होता.दरम्यान मशीनच्या साह्याने पाईप बाजूला घेत असताना उखडून निघालेली पाईप `उत्तम` याच्या डोक्यावर पडली.त्यामुळे `उत्तम` हा खाली कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान त्याला तातडीने निपाणीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यानुसार त्याच्यावर तीन दिवसापासून उपचार सुरू होते. दरम्यान त्याला बुधवारी सकाळी कोल्हापुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान `उत्तमचा` मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रपरिवारास कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन एकच आक्रोश केला.मयत `उत्तम` याच्यावर गुरुवारी सकाळी मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी दोन मुली, एक मुलगा विवाहित बहीण असा परिवार आहे.
दानशूरांच्या दातृत्वाची गरज….
प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळात हाकेला धावणारा `उत्तम` नावाप्रमाणेच समाजात त्याची प्रतिमा `उत्तमच` होती. परंतु नियतीला ते बघवले नाही.`उत्तम` च्या जाण्याने पोरक्या झालेल्या कुटुंबाला समाजातील दानशूरांच्या दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे.
-हेही वाचा