समृद्धीवर पुन्हा चार बळी; चालकाला डुलकी लागल्याने कारचा भीषण अपघात | पुढारी

समृद्धीवर पुन्हा चार बळी; चालकाला डुलकी लागल्याने कारचा भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार आधी दुभाजक आणि नंतर इमर्जन्सी गेटवर आदळून कारमधील चौघी भावंडे ठार झाली, तर १८ वर्षीय तरुण जखमी आहे. काकांचा अंत्यविधी आटोपून ते तेलंगणातून सुरतकडे (गुजरात) जात असताना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाडजवळ बुधवारी (दि. २४) पहाटे हा अपघात झाला. समृद्धीवरील जिवघेणे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे.

सुरेशभाई रामू गौड (३८), श्रीनिवास रामू गौड (३६), संजय राजनभाई गौड (४३) आणि कृष्णा राजनभाई गौड (४८, सर्वजण, रा. सुरत, गुजरात), अशी मृतांची नावे आहेत. भार्गव सुरेशभाई गौड (१९) हा जखमी आहे. मृत चौघे चुलत भाऊ आहेत, अशी माहिती करमाड ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिली.

गौड कुटुंबीय सुरतमध्ये कापड व्यापार करतात. त्यांचे मूळ गाव तेलंगणमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या काकांचे निधन झाल्यामुळे चौघे भाऊ आणि भार्गव हे पाचजण अंत्यविधीसाठी स्वत:च्या इटिंगा कारने (जीजे ०५, आरएन ८४५०) तेलंगणात गेले होते. अंत्यविधी आटोपल्यावर २३ मे रोजी ते सुरतच्या दिशेने निघाले. २४ मे रोजी पहाटे त्यांची कार समृद्धी महामार्गावर करमाड ठाण्याच्या हद्दीत जयपूर शिवारात आली. संजय गौड हे कार चालवीत होते. कारचा वेग १२० कि.मी. प्रति तासापेक्षा अधिक होता. नेमके त्याच वेळी चालक संजय गौड यांना डुलकी लागली आणि त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याच वेगात कार दुभाजकावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती, की कारमधील श्रीनिवास, कृष्णा आणि संजय हे तिघे जागीच ठार झाले. सुरेशभाई गौड आणि त्यांचा मुलगा भार्गव हे जखमी होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना सुरेशभाई यांचाही मृत्यू झाला. भार्गववर उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर पहाटे अपघात झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांच्यासह करमाड ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर खोकले आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. महामार्ग पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक व्ही. एस. भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

२१ मे रोजी काकांचे निधन झाले. त्यामुळे गौड कुटुंबीय दुःखात होते. त्यानंतर त्याच कुटुंबातील चौघे भाऊ अपघातात ठार झाल्याने गौड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेशभाई आणि श्रीनिवास आणि संजय आणि कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत.

Back to top button