नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची | पुढारी

नाशिक : विभागप्रमुखांना दिवसातून तीनदा हजेरी सक्तीची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, मनपा मुख्यालयात स्वैर कारभार सुरू असल्याची बाब प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्दशनास आला. कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकारीच बेभान झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्व विभाप्रमुखांना दिवसातून तीनदा बायोमेट्रिक पंचिग (हजेरी) करणे बंधनकारक केले आहे. बुधवारपासून (२४) या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली असून, अधिकाऱ्याने टाळाटाळ केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

महापालिका अधिकारी बेशिस्त वागत असल्याने कर्मचारी बेभान झाल्याची बाब प्रभारी आयुक्त गमे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना शिस्तीवर आणण्यासाठी एकापाठोपाठ एक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना दिवसातून तीन वेळा विविध विभागात भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बैठकीच्या नावाखाली बाहेर बिनधास्त फिरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. आयुक्त गमे यांनी केवळ कर्मचारीच नव्हे तर आता अधिकार्‍यांना रडारवर घेतले आहे. अधिकारीच कार्यालयीन वेळेत व्हिजिटच्या नावाखाली हजर नसल्याचे आढळत असल्याने अधिकाऱ्यांना अभय अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची कुजबुज मनपा वर्तुळात रंगत असल्याने, ही सक्ती करण्यात आल्याची चर्चाही यानिमित्त रंगत आहे. पंचिग मशीन मनपा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असून त्या ठिकाणी सीसीटिव्ही आहेत. विभागप्रमुखांनी तीनदा पंचिग केले नाही तर त्यांना कारवाईला समोरे जावे लागेल. मागील आठवड्यात एका उपायुक्तासह वीस ते तीस अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले होते.

ई-मूव्हमेंटचा प्रभाव

प्रभारी आयुक्त गमे यांनी गेल्या आठवड्यातच ई-मूव्हमेंट प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी बाहेर पडायचे असल्यास संबंधित विभाग प्रमुखांकडे ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवानगी बाहेर पडल्यास एक दिवसाचे वेतन कपात केले जाईल, त्याची धास्ती आता कर्मचाऱ्यांनी घेतली असून, बाहेर पडण्याऐवजी कार्यालयातच बसून काम करण्यास पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

हजेरीच्या वेळा अशा…

सकाळी : ९.४५ मिनिटे

दुपारी : ३ वाजता

सायंकाळी : ६ वाजता

हेही वाचा:

Back to top button